कोरोना महामारी : जगात दर 15 सेकंदात एका व्यक्तीचा होतोय मृत्यू

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   जगभरात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या बुधवारी 7 लाखांच्या पुढे गेली आहे. जगात सरासरी प्रत्येक 15 सेकंदात कोरोना विषाणूमुळे एक व्यक्तीचा मृत्यू होतो. गेल्या 2 आठवड्यांच्या आकडेवारीच्या आधारे हे विश्लेषण जारी करण्यात आले. अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिको या देशांत कोरोनामुळे मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत आहे. जगात दर 24 तासांत कोरोनामुळे 5900 लोकांचा मृत्यू होत आहे. म्हणजेच, एका तासामध्ये सरासरी 247 लोक किंवा दर 15 सेकंदात एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे.

अमेरिका आणि लॅटिन अमेरिका कोरोना विषाणूची प्रमुख केंद्रे म्हणून उदयास येत आहेत. भीषण कोरोना संकटावर मात करण्यासाठी दोन्ही देश संघर्ष करत आहेत. सुरुवातीला, लॅटिन अमेरिकेत कोरोनाचा प्रसार कमी होता. लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन प्रदेशातील 10 कोटी लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. बर्‍याच लोकांना अनौपचारिक क्षेत्रात नोकर्‍या असतात. यामुळे, येथे साथीचा रोग लवकर पसरत आहे. अमेरिकेचे अग्रगण्य महामारी रोग तज्ज्ञ अँटनी फौची यांनी सोमवारी म्हटले की, ज्या अमेरिकन राज्यांमध्ये कोरोनाची अधिक प्रकरणे येत आहेत त्यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार करायला हवा.

दुसरीकडे ऑस्ट्रेलिया, जपान, हाँगकाँग, बोलिव्हिया, सुडान, इथिओपिया, बल्गेरिया, बेल्जियम आणि इस्त्राईल या देशांमध्ये पूर्वी कोरोनावर मात करतांना पाहिले गेले होते, पण आता या देशांमध्येही एका दिवसात विक्रमी प्रकरणे नोंदविली जात आहेत. जगात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,87,10,432 वर पोहोचली आहे. यात अशी प्रकरणे आहेत, ज्यांची नोंद आहे. त्याचबरोबर असेही म्हटले जात आहे की, सर्व देशांमध्ये अश्याही लोकांची संख्या जास्त आहे, ज्यांची तपासणी केली गेली नाही.