Coronavirus : कल्याण डोंबिवलीतील एक सकारात्मक बातमी

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये नागरिक भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. एका बाजूला रुग्णांची वाढणारी संख्या, दुसऱ्या बाजूला महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय नसल्यामुळे या रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.

कल्याण कल्याण पूर्वेतील दुर्गा माता परिसरात रहिवाशी असलेल्या मुकेश झा या नागरिकाला कोरोना संसर्गाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्या तीन मुलांसह १०४ वर्षे वय असलेल्या वडिलांचा कोरोना संसर्ग चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. २३ तारखेला त्यांचे वडील आनंदी झा यांना ठाणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत.

अखेर प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ११ दिवसांच्या लढ्यानंतर १०४ वर्षाचे आंनदी झा यांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे. त्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना ५ जुलै रोजी सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते कल्याण येथील घरी परतले. कोरोना संसर्गाला हरवणाऱ्या या वयोवृद्ध योद्धाच परिसरातील नागरिकांनीही आनंदात स्वागत केलं आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी यापूर्वीच महापालिकेकडून पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.