Coronavirus : डॉक्टर्स, नर्सेसच्या कार्याला गुगलचा ‘सलाम’, बनवलं खास ‘डूडल’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनामुळे नागरिकांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत. त्यामध्ये आरोग्य सेवा देणार्‍या डॉक्टर, नर्सेस आणि इतर सगळ्या कर्मचार्‍यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. दिवस-रात्र एक करुन आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या संकट अधिक पसरू नये यासाठी काम करताना दिसत आहे. डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्चमार्‍यांच्या याच निस्वार्थ वृत्तीला गुगलने डूडलच्या माध्यमातून अनोखा सलाम केला आहे. कोरोनाविरुद्ध दोन हात करणार्‍या डॉक्टर आणि नर्सेससाठी गुगलने खास ‘थँक यू’ म्हणणारे डूडल बनवले आहे.

गुगलच्या या खास डूडलवर कर्सर नेल्यावर डॉक्टर, नर्स आणि आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍यांना धन्यवाद देणारा मेसेज दिसून येत आहे. या डूडलमध्ये वरच्या बाजूला हृदयाचा इमोन्जीही दिसत आहे. या संकटाशी दोन हात करणार्‍यांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी हा इमोन्जी वापरण्यात आला आहे. जगभरातील अनेक देशामध्ये आलेल्या या संकटावर मात मिळवण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी दिवस रात्र काम करत आहेत. अशावेळी या डॉक्टर आणि नर्सेसला मानसिक आधाराची गरज असते.

तोच आधार देण्यासाठी आणि ते करत असलेल्या सेवेसाठी गुगलने आजचे डूडल समर्पित केले आहे. या संकटाच्या प्रसंगी फ्रण्ट लाइनवर काम करणार्‍या सर्वांच्या कामाची नोंद घेण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही डूडलच्या काही सीरीज लॉन्च करत आहोत, असे गुगलने म्हटले आहे.