Coronavirus : गुजरातनं तोडला चीनचा ‘रेकॉर्ड’, 6 दिवसात तयार केलं 2200 बेडचे 4 COVID हॉस्पीटल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या 799 वर पोहोचली आहे आणि आतापर्यंत 21 लोक मरण पावले आहेत. त्याचबरोबर गुजरात राज्यात संक्रमित रुग्णांची संख्या 47 वर पोहोचली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी गुजरातने 6 दिवसात 2200 बेड असलेले रुग्णालये तयार केली आहेत. असे करून गुजरातने चीनचा रेकॉर्ड तोडला आहे.

चीनने 10 दिवसात 1000 बेड असलेले रुग्णालय बांधले होते. त्याचबरोबर, अवघ्या ६ दिवसांत गुजरातने 4 शहरांमध्ये एकूण 2200 बेड असलेले रुग्णालये तयार केले आहेत. 21 मार्च रोजी गुजरात सरकारने रुग्णालय तयार करण्याची घोषणा केली होती.

गुजरात सरकारने अहमदाबादमध्ये 1200 बेड, सूरतमध्ये 500 बेड, वडोदरामध्ये 250 बेड आणि राजकोटमध्ये 250 बेडची सुविधा असलेले एक हॉस्पिटल बनवले आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि केंद्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ही रुग्णालये तयार केली गेली आहेत. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पंकज कुमार यांना रुग्णालय चालविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग भारतासह जगभर पसरला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, जगभरात 5 लाखाहून अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे, तर 24 हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहेत.