‘लॉकडाउन’ बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे ‘सूचक’ विधान !

 पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे केंद्र सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून 21 दिवसांचा लॉकडाउनला अजून सात दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे गेल्या 14 दिवसांपासून घरात असलेले नागरिक लॉकडाउन संपण्याची वाट बघत आहेत. मात्र, देशातील लॉकडाउन शिथिल करण्यात येणार असला, तरी महाराष्ट्रातील लॉकडाउन आणखी लांबणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. 15 एप्रिलपासून लॉकडाउन संपूर्णपणे शिथिल होईल, असे कुणीही गृहित धरू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. टोपे म्हणाले, लॉकडाउन शिथिल कसा करायचा यासंदर्भात काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे याबाबत केंद्र सरकार राज्य सरकारला मार्गदर्शक सूचना पाठवत असते.

त्यानुषंगाने राज्य सरकार काम करते. त्यामुळे दहा आणि 15 एप्रिलच्या दरम्यान जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा अभ्यास करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्र सरकारचे सल्लागार यांच्या अनुषंगाने ठरवावे लागेल. परंतु एक निश्चित आहे की, संपूर्ण लॉकडाउन उठेल, असे कुणीही डोक्यात ठेवू नये. शंभर टक्के यामध्ये काळजीपूर्वक काम करावे लागणार आहे. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी खूपच जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे लॉकडाउन 15 एप्रिलनंतर शंभर टक्के शिथिलच होईल हे आतातरी शक्य नाही.

दरम्यान कोरोना बाधितांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट’(पीपीई)ची गरज आहे. राज्य सरकारने त्याची परस्पर खरेदी करू नये, असे निर्देश दिले असल्याने मागणी नोंदविण्यात आली आहे. महाराष्ट्रात प्रमाणित असणार्‍या तीन पीपीई उत्पादक कंपन्यांनी त्याचे उत्पादन वाढवावे, यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र गरज भासल्यास दक्षिण कोरिया अथवा चीनमध्ये स्वतंत्र विमान पाठवून पीपीई आणता येतील काय, याची तयारी सुरू केली आहे. पालघर तालुक्यातील प्राइम वेअर ही कंपनी टाळेबंदीमध्ये काही दिवस बंदच होती. ती सुरू करण्यासाठी तेथील कामगारांना स्वतंत्र सुरक्षा पास देण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, राज्यात होणारी करोना विषाणूची बाधा हा चिंतेचा विषय नाही तर त्याचा मृत्यूचा दर वाढतो आहे असेही टोपे म्हणाले.