राज्यातील कडक निर्बंध 1 मे नंतरही वाढवले जाऊ शकतात, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेले ‘ब्रेक द चेन’ निर्बंध 1 मे नंतरही वाढवण्यात येऊ शकतात, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते.

जालना येथील जिल्हाधीकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, 15 एप्रिल पासून राज्यात कडक निर्बंध आणि संचारबंदी लागू केली आहे. 1 मे रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत हे निर्बंध कायम राहतील. महाराष्ट्रातील जनतेने या निर्बंधांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. आता या पंधरा दिवसांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच हे नर्बंध पुढे किती दिवस ठेवायचे की उठवायचे याचा निर्णय घेतला जाईल, असे टोपे यांनी सांगितले.

राज्यात काही ठिकाणी कोविड-19 च्या प्रसारावर निर्बंध आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सीआरपीसीच्या कलम 144 च्या उल्लंघनाचे प्रकार दिसून येत आहेत. राज्यात कोरोनामुळे ज्या प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे, ते पाहता राज्यात लावण्यात आलेले निर्बंध मे महिन्यापर्यंत पुढे वाढवण्यात येऊ शकता. मात्र, कोरोना स्थितीवर हे अवलंबून आहे. असे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांसाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बधांवर राज्यात जे परिणाम समोर येतील, त्याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. आणखी ऑक्सिजनची गरज भासणार आहे. त्यामुळे गरज पडल्यास छत्तीसगड, तामिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यातून रेल्वे वॅगन द्वारे ऑक्सिजन आणला जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.