उद्धव ठाकरेंचा अनुभव कमी पडतोय का ? अमित शहांनी दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोनाबाधितांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा पावणे दोन लाखांच्या पुढे गेला आहे. यातील 65 हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. मुंबई, ठाणे आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आहेत. कोरोना संकटाला तोंड देण्यात राज्यांतलं महाविकास आघाडिचं सरकार कमी पडत असल्याचा आरोप भाजप वारंवार करत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. यावर गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

देशातील प्रत्येक राज्यानं कोरोनाविरुद्ध संघर्ष केला आहे आणि अजूनही संघर्ष सुरुच आहे. या लढाईकडे आकड्यांच्या दृष्टीकोनातून पहायला नको. हे राज्य अपयशी ठरलं, ते यशस्वी झालं, असं आकडेवारी पाहून ठरवायला नको. ही लढाई प्रत्येकाची आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारं, देशातील जनता सगळेच जण ही लढाई लढत आहेत. ज्याला हे शक्य होतं, त्याने ते आपल्या परीनं उत्तम प्रकारे केलं आहे, असे अमित शाह यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

नारायण राणे यांच्या मागणीवर बोलताना अमित शाह म्हणाले, ती त्यांची वैयक्तिक मागणी आहे. ती भाजपची मागणी नाही. प्रत्येक राज्यानं त्यांना शक्य होतं, तितकं उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रशासकीय अनुभव कमी पडतोय का, असे विचारले असता अमित शाह यांनी यावर कोणतेही भाष्य केले नाही. प्रत्येक राज्यातल्या सरकारनं, तिथल्या प्रशासनानं कोरोनाविरुद्धच्या लढाईत चांगलं काम केलं आहे, असे अमित शहा यांनी सांगितलं.