Coronavirus : ‘कोरोना’ रोखण्यासाठी मार्चपासूनच गुजरातमधील निम्म्या लोकांना दिलं गेलं ‘होमिओपॅथी’चं औषध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे की, कोविड – 19 च्या उद्रेकानंतर मार्च महिन्यातपासूनच विभागाने रोगप्रतिबंधक औषध म्हणून होमिओपॅथी औषध आर्सेनिकम अल्बम- 30 चे वितरण अर्ध्याहून अधिक लोकांना केले आहे. गुजरातमधील कोविड – 19 च्या प्रतिबंधात्मक रणनीतीवर 20 ऑगस्ट रोजी जागतिक आरोग्य संघटनेसमोर केलेल्या सादरीकरणात, राज्य आरोग्य विभागाने म्हंटले की, विभागाने राज्यातील सुमारे 3.48 कोटी लोकांना आर्सेनिकम अल्बम-30 वाटप केले.

दरम्यान, कोविड – 19 च्या उपचारासाठी हे औषध उपयुक्त असल्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे सापडलेले नाहीत. राज्य सरकारने असाही दावा केला आहे की, आयुष (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) चा लाभ घेणाऱ्यांपैकी 99.6 टक्के लोक क्वारंटाईन काळात या रोगप्रतिबंधात्मक औषधाच्या वापरानंतर संसर्गमुक्त असल्याचे आढळले. प्रसारमाध्यमांशी शेअर केलेल्या आपल्या सादरीकरणात आरोग्य विभागाने म्हंटले की, आयुष अंतर्गत सुचविलेल्या उपचारपद्धती रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात उपयुक्त ठरल्या आहेत.

आयुष उपचाराच्या कार्यक्षमतेचे आकलन करण्यासाठीही संशोधन करण्यात आले. “विभागाने म्हंटले,” क्वारंटाईन काळात आयुष औषधांचा 33,268 लोकांना फायदा झाला, यातील निम्म्या लोकांनी होमिओपॅथीक औषधे घेतली. गुजरातचे प्रधान सचिव जयंती रवी यांनी रविवारी सांगितले की, आर्सेनिकम अल्बम -30 औषधाच्या सामर्थ्याबद्दल विश्वास होता, कारण ज्या लोकांना आर्सेनिकम अल्बम-30 चा डोस देण्यात आला, त्यातील 99.69 टक्के कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त आढळले.