Coronavirus : हॉटेल्स, बार देखील बंद करण्याची सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळा, माहाविद्यालये, मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व खासगी आणि शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. असे असताना हॉटेल आणि बार मात्र सुरु ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हॉटेल आणि बारमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे हॉटेल आणि बार देखील बंद केले पाहिजेत, अशी मागणी आता करण्यात येत आहे. हॉटेल आणि बारमध्ये लोकांची गर्दी होत असते. या ठिकाणी लोक एकमेकांना खेटून बसतात त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची खबरदारी किंवा काळजी घेतली जात नाही. अशा बार आणि हॉटेलमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या अधिक असते. त्यामुळे बार व हॉटलमधून देखील कोरोनाचा संसर्ग पसरू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरण्याची भीती असल्याने शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा अमलात आणला आहे. खबरदारी म्हणून मॉल, चित्रपटगृह, सभागृह आदींना लागू केलेली बंदी बार व हॉटेलांना देखील लागू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सरिता नाईक, कृष्णा गुप्ता यांच्यासह भाजपचे कमलाकर घरत, मनसेचे हेमंत सावंत, राष्ट्रवादीचे पोर्णीमा काटकर, शिवसेनेच्या वेदाली परळकर आदींनी केली आहे. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पार्सल पद्धतीवर भर द्यावा अशी सूचना देखील त्यांनी केली आहे.