Coronavirus : ‘हॉटस्पॉट’च्या ठिकाणी ‘जमाव’बंदी राहणार – आरोग्य मंत्री राजेश टोपे

पोलीसनामा ऑनलाईन :आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे सर्व राज्यातील काही ठराविक मंत्र्यांना जी काही माहिती दिली त्यापैकी काही सल्ले त्यांनी जनतेला सांगितले आहेत. ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट असतील त्या ठिकाणी जमावबंधी कायम राहणार आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. इतकंच नाही तर आपण जे कॅन्टॉनमेंट झोन तयार केले आहेत त्या ठिकाणी प्रामुख्यानं सोशल डिस्टेंसिंगसारख्या गोष्टींवर जास्त भर देण्यात आला आहे असंही ते म्हणाले आहेत.

राजेश टोपे यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आज राज्य सरकारला केंद्र सरकारकडून रॅपिड टेस्टसाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळं आता एखाद्याला व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही याची माहिती आता 5 मिनिटांत मिळणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्री मोदींनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी संवाद साधला. यावेळीच त्यांनी आपल्याला रॅपिड टेस्टसाठी परवानगी दिली आहे असं राजेश टोपे म्हणाले.

राजेश टोपे म्हणाले, “राज्यातील टेस्टींग वाढवलं गेलं पाहिजे अशी आशा नरेंद्र मोदींनी व्यक्त केली. आपल्या राज्याची क्षमता 5 हजार चाचण्या करण्याची आहे. याआधी आपल्याला रॅपिड टेस्टसाठी परवानगी मिळाली नव्हती. आता मात्र यासाठी परवानगी देण्यात आली आहे. रॅपिड टेस्टिंगच्या माध्यमातून प्राथमिक चाचणी म्हणजेच स्क्रिनिंग केल्यानं एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे की, नाही हे 5 मिनिटात कळेल. राज्य शासनाकडून त्यासंबंधी कारवाई केली जाईल. आपल्याला जर कोरोनाची लागण झालेल्या संख्येचा अंदाज आला तर तात्काळ त्यांचं विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार केले जातील.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.