Coronavirus : ‘एसिम्प्टोमॅटिक’ म्हणजेच लक्षणं न दिसणारे रूग्ण आढळणं किती धोकादायक ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत लॉकडाऊन २ मध्ये सध्या सूट दिली जात नाहीये. यामागे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेक कारणे उपस्थित केली आहेत. त्यापैकी एक म्हणजे दिल्लीमध्ये लक्षणं न दिसणारे कोरोना रुग्ण आढळणे. होय, लक्षणं न दिसणारे कोरोना रूग्ण. हे असे रुग्ण आहेत ज्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, तरीही ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

रविवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, अशा रुग्णांनी त्यांची चिंता अधिक वाढवली आहे. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “दिल्लीत जास्त कोरोना चाचण्या सुरू झाल्या आहेत. एका दिवसात घेण्यात आलेल्या ७३६ चाचण्यांपैकी १८६ लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. ही सर्व ‘एसिम्प्टोमॅटिक’ प्रकरणे आहेत म्हणजेच त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षण नव्हती. कोणाला ताप, खोकला, श्वास घेण्याचा त्रास याची तक्रार नव्हती. ते कोरोना घेऊन फिरत आहे हे माहित नव्हते, हे आणखी धोकादायक आहे. कोरोना पसरला आहे आणि कळतही नाही की त्यांना कोरोना झाला आहे.”

अशी प्रकरणे केवळ दिल्लीच नव्हे तर देशातील इतर राज्यांमधूनही येत आहेत. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आसाम, राजस्थान यासारख्या इतर राज्यांनीही अशा घटना घडल्याचे सांगितले आहे. या संदर्भात एसिम्प्टोमॅटिक कोरोनाची प्रकरणे भारतातील डॉक्टरांसाठी नवीन डोकेदुखी बनली आहेत.

संक्रमण कधी-कधी पसरते?
त्याबद्दल अधिक माहिती देण्यापूर्वी कोरोना संक्रमण कोणत्या मार्गांनी पसरते हे जाणून घेणे महत्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोरोना इन्फेक्शन पसरण्याचे तीन मार्ग आहेत.

सिम्प्टोमॅटिक – ते लोक ज्यांना कोरोनाची लक्षणे होती आणि नंतर ती इतरांमध्ये पसरली. हे लोक लक्षणे दाखवल्यानंतर पहिल्या तीन दिवसात लोकांमध्ये कोरोना पसरवू शकतात.

प्री सिम्प्टोमॅटिक – व्हायरस पसरला आणि लक्षणे दर्शवली तरीही कोरोनाचा संसर्ग पसरतो. त्याची वेळ मर्यादा १४ दिवस आहे, जी या विषाणूचा इन्क्युबेशन पिरियड देखील आहे. हे सरळ कोरोनाची लक्षणे दर्शवत नाही. पण सुरुवातीच्या काळात हलका ताप, शरीरदुखी यासारखी लक्षणे दिसतात.

एसिम्प्टोमॅटिक – ज्यात कोणतीही लक्षणे नसतात परंतु कोरोना पॉझिटिव्ह असतात आणि संसर्ग पसरवू शकतात.

जगातील इतर देशांमध्येही एसिम्प्टोमॅटिक प्रकरणं आढळून आली आहेत, पण त्यांची संख्या भारतात जास्त आहे.

असे रुग्ण आव्हान का आहेत?
बंगळुरूच्या राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेचे डॉ. सी. नागराज असा दावा करतात की जगभरात अशाप्रकारची एसिम्प्टोमॅटिक कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे ५० टक्क्याच्या आसपास आहेत. त्यांच्या संस्थेबद्दल बोलताना ते म्हणाले की १२ रुग्णांपैकी ५ एसिम्प्टोमॅटिक रुग्ण, म्हणजे जवळजवळ ४० टक्के.

डॉ. नागराज यांच्या म्हणण्यानुसार सर्वात महत्वाची बाब म्हणजे या रुग्णांचे वय. पाचपैकी तीन रुग्ण ३०-४० वर्षे वयोगटातील आहेत, चौथा रुग्ण १३ वर्षांचा आणि पाचवा रुग्ण ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे. दिल्लीत आढळून आलेले एसिम्प्टोमॅटिक कोरोना रुग्णांच्या वयाचे प्रोफाइल समोर आलेले नाही. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, जगात एसिम्प्टोमॅटिक कोरोना रूग्णांची संख्या फारशी नाही. पण सरकार निश्चितच त्याला एक आव्हान मानत आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या प्रकरणांचा सामना करण्यासाठी आपणसुद्धा तयार असले पाहिजे. ते म्हणाले की, जे हॉटस्पॉट एरियामध्ये राहतात आणि ज्येष्ठ आहेत, त्यांना जास्त धोका आहे, त्यांनी त्यांच्या चाचण्या केल्या पाहिजेत. तसेच जे लोक एसिम्प्टोमॅटिक आहेत परंतु कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वत:ला आयसोलेट केले पाहिजे. गरज भासल्यास आमच्याशी संपर्क साधा, त्यांना रुग्णालयात ठेवण्याची गरज आहे, मग आम्ही त्यांना ती सुविधा देखील देऊ.

भारतासाठी चिंता का?
डॉ. नागराज यांच्या मते भारतातील तरुण लोकसंख्या इतर देशांपेक्षा अधिक आहे आणि त्यांना कोरोना होण्याचे प्रमाण जास्त आहे. हेच कारण आहे की भारताने या नवीन ट्रेंडबद्दल काळजी घेणे आवश्यक आहे. ४ एप्रिल रोजी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात २० ते ४९ वर्षे वयोगटातील ४१.९ टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ४१ ते ६० वयोगटातील सुमारे ३२.८% लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, देशातील तरुणांना कोरोनाची लागण होत आहे. डॉ. नागराज यांच्या मते, यामागे एक कारण हे देखील असू शकते की भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती दुसर्‍या देशातील नागरिकांपेक्षा चांगली आहे, त्यामुळे भारतीयांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत आणि तरीही ते कोरोनाचे रुग्ण आहेत.

डॉ. नागराज यांच्याशी सवाई मानसिंग रूग्णालयाच्या डॉ.एम.एस. मीना देखील सहमत आहेत. त्यांच्या मते भारतीयांचे राहणे, भौगोलिक परिस्थिती याला जबाबदार आहे. आपला प्रदेश गरम आहे, आपण गरम अन्न खातो, गरम पेय पितो, यामुळे आपल्याकडे एसिम्प्टोमॅटिक प्रकरणे जास्त आढळतात. त्यांच्या मते कोरोना विषाणू उष्णता संवेदनशील आहे.

डॉ. मीना मानतात की हा आजार तरूणांमध्ये अधिक पसरत आहे आणि जास्त लोकही बरे होत आहेत. हा सर्व या गोष्टीचा पुरावा आहे की भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली कार्य करते आणि म्हणूनच कोरोनामुळे मृत्यूही भारतात कमी आहेत.

एसिम्प्टोमॅटिक प्रकरणे जास्त धोकादायक आहेत
लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांसाठी डॉ. मीना ‘दोन तोंडी’ तलवार म्हणतात. त्यांच्या मते जेव्हा एखाद्या रूग्णाला कोणतीही लक्षणे नसतात, तेव्हा ते त्यांची चाचणी देखील करत नाही, मग त्यांना कळणारच नाही आणि ते कोरोना पसरवत राहतील.

डॉ मीना म्हणतात की जो कोणी बाहेर पडतो त्याने त्याची चाचणी करावी. लोकांना हे समजताच कि जे लोक संपर्कात आले ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यांनी स्वतः पुढे येऊन चाचणी केली पाहिजे. डॉ. नागराज आणि डॉ. मीना दोघेही म्हणतात की रॅपिड टेस्टिंग आणि पूल टेस्टिंग अशा प्रकरणांना पकडण्यास नक्कीच मदत करेल. परंतु तरुणांनी देखील स्वत:ची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.