Coronavirus : पुणेकरांना आणखी किती शिक्षा देणार ? महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमदार सिद्धार्थ शिरोळेंचा सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना साथीच्या संदर्भात एक महिना झाले , पुणे हॉटस्पॉट झाले आहे. तरीही वैद्यकीय सुविधा पुरविण्यात महाविकास आघाडी सरकारला सातत्याने अपयश येत असून पुणेकरांना ते आणखी किती शिक्षा देणार? असा सवाल आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला आहे.

राज्याचे मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीन जंबो कोवीड सेंटर्सचे उदघाटन २९ दिवसांपूर्वी केले. या तिन्ही सेंटर्समध्ये मिळून कोरोनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचारांसाठी १,९५० बेड्स उपलब्ध असतील असे मुख्य मंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. मात्र, आजमितीला त्यातील केवळ ४५% बेड्सच उपयोगात येऊ शकतात अशी स्थिती आहे. सीईओपी येथील कोवीड सेंटरमध्ये ६०० ऑक्सिजन बेड्स आणि २००आयसीयू बेड्स असे ८०० बेड्स उपलब्ध होतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तिथे २७० ऑक्सिजन बेड्स, ३० आयसीयू बेड्स, ३० आयसीयू व्हेंटिलेटर्स असे फक्त ३३० बेड्स उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत गंभीर रुग्णांवर उपचार कधी होणार? शहरातील मृत्यूदर कमी कधी होणार? असा प्रश्न उद्भवतो असे आमदार शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

अधिकृत यंत्रणांच्या डॅश बोर्डवर शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये अवघे चार व्हेंटिलेटर्स उपलब्ध असल्याचे दाखविले आहे. वस्तुस्थिती पाहाता वैद्यकीय यंत्रणांची स्थिती याहीपेक्षा वाईट आहे. तातडीचे उपचार न झाल्याने आणि व्हेंटिलेटर्स उपलब्ध न झाल्याने कोरोनाबाधित अनेक रुग्ण दरदिवशी जीव गमावत आहेत ही स्थिती मन विषण्ण करणारी आहे. असे आमदार शिरोळे यांनी पत्रकात म्हटले आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ असा कार्यक्रम मुख्य मंत्र्यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केला. दारोदारी प्रशासकीय अधिकारी जावून कोरोना चाचण्या करतील याचा त्यात अंतर्भाव होता. शहरातील आजची आकडेवारी पाहिली तर दररोज फक्त ६ हजार जणांच्याच कोरोना चाचण्या होत असल्याचे आढळते असेही आमदार शिरोळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.