दिलासादायक ! ‘कोरोना’ व्हायरसवर ‘हे’ औषध ‘प्रभाव’शाली, ‘नॅशनल टास्क फोर्स’नं दिला सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे कोविड-19 या आजाराच्या अतिगंभीर प्रकरणाच्या उपचारासाठी ‘हायड्रोक्जिक्लोरीक्वीन’ (Hydroxychloroquine) या औषधाचा वापर केला जाऊ शकतो, असा सल्ला ‘इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ द्वारे (ICMR) गठीत करण्यात आलेल्या ‘नॅशनल टास्क फोर्स’नं दिला आहे. सध्या ‘हायड्रोक्जिक्लोरीक्वीन’ औषधाचा वापर मलेरियाच्या रुग्णांसाठी केला जातो. आता हेच औषध कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या आरोग्य सेवकांना दिले जाऊ शकते, असे ‘आयसीएमआर’ ने म्हंटले आहे. याशिवाय कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांनी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील हे औषध दिले जाऊ शकते, असे देखील सूचित करण्यात आले आहे.

अतिशय वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आत्तापर्यंत लस शोधून काढण्यात यश आलेले नाही. याच दरम्यान ‘हायड्रोक्जिक्लोरीक्वीन’ हे औषध कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी फायदेशीर ठरु शकते, असे संशोधनामधून समोर आले आहे. या संशोधनामध्ये ‘क्लोरोक्वीन फॉस्फेट’ आणि ‘हायड्रोक्जिक्लोरीक्वीन सल्फेट’ कोरोनाच्या उपचारासाठी मदत करु शकते, असे देखील आढळून आले आहे.

विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही याच औषधांचे नाव सुचवले होते. अमेरिकेतील ‘फूड ऍन्ड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन’ (FDA) हे औषध मोठ्या प्रमाणात आयात करत आहे. चीनच्या आरोग्य विभागानेही फेब्रुवारी महिन्यात ‘क्लोरोक्वीन फॉस्फेट’च्या च्या वापराचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे जाहीर केले होते.

ICMR कडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत देशात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 415 वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरही ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. 23 मार्च 2020 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत 17,493 व्यक्तींच्या 18,383 नमुन्यांची ‘कोविड 19’ चाचणी करण्यात आल्याचंही यात म्हटले गेले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत 23 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार यशस्वी ठरले आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील मिळाला आहे. तर देशात 7 जणांनी आपला जीव गमावला आहे.