Coronavirus : ‘जर लोकांनी ऐकलं नाही तर प्लॅन बी रेडी’ : डॉ. तात्याराव लहाने

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : सध्या जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. भारतात देखील या विषाणूने थैमान घातले असून महाराष्ट्रात ही संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र्र सरकारनेही महत्वाचे पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात एका वृत्तपत्राने वैद्यकीय शिक्षण मंडळाचे संचालक असलेल्या डॉ. तात्याराव लहाने यांची मुलाखत घेतली, त्यात तात्यारावांनी स्पष्ट केले की, राज्यातील परिस्थिती सध्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे आणि घरातच थांबावे. जेणेकरून कोरोना विषाणू तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार नाही. परंतु लोक हे मनावर न घेता बाहेर सातत्याने फिरत राहिले तर हा आजार तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करायला वेळ लागणार नाही. हा एक अदृश्य शत्रू असून तो आपल्याला दिसत नाही, त्यामुळे तो कसा येईल आणि कुठून येईल आणि हल्ला करेल हे लक्षात येत नाही. म्हणून घरीच राहणे सध्याला फार महत्वाचे आहे. तेव्हाच तो नियंत्रणात येऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे तात्याराव म्हणाले की, या विषाणूपासून लोकांनी काळजी घेतली पाहिजे, तेव्हाच त्याची लागण कमी होईल. तसेच ते म्हणाले की, मुंबईतील सर्वच रुग्णालये ही आयसोलेशनसाठी वापरण्यात येतील. मुंबईमध्ये एकूण ३१५ आयसोलेशन खाटा तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ७० खाटांमध्ये जिथे सीसीयू म्हणजे व्हेटिंलेटर्स लागतात, अशा खाटांची सोय करत आहोत. तसेच काही रुग्णांना जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवत आहोत, तर बालरुग्णांना कामा रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. प्रत्येक खाटेमध्ये ३ फुटांचे अंतर ठेवण्यात येत असून ६ वार्ड तयार करण्यात आले आहेत.

ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे अशा रुग्णांना एक स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. ही व्यवस्था सेंट जॉर्ज रुग्णालयात करण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत ते पूर्ण होईल. सध्या महाराष्ट्रात कस्तुरबा, नायडू ही कोरोना समर्पित रुग्णालये आहेत, तर सेंट जॉर्ज रुग्णालयातही स्वतंत्रपणे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. जर गरज भासली तर जी. टी. रुग्णालय देखील रिकामी करून तेथे २५० खाटांचं नियोजन करण्यात येईल. दरम्यान ही सर्व रुग्णालय २९ तारखेपर्यंत कार्यरत होतील असं त्यांनी स्पष्ट केले.

तसेच त्यांनी सांगितले की पुण्यात देखील ११ मजली रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण झालं असून तिथे जवळपास ६०० आयसोलेशनच्या खाटा आणि क्रिटिकल केअर युनिटच्या १०० खाटा सुरु केल्या जाणार आहेत. तर नागपूरमध्ये देखील आयसोलेशनच्या ३०० खाटा आणि क्रिटिकल केअर युनिटच्या ६० खाटा ठेवण्यात आल्या आहेत.

तात्यारावांना महाराष्ट्रातील लॅबसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्रात जवळपास २१ लॅब या वेगवेगळ्या ठिकाणी सुरु करण्यात येणार आहेत. सध्या महाराष्ट्रात १२ लॅब आहेत. या लॅब पुणे आणि मुंबई या ठिकाणी असून बाहेरच्या ठिकाणी या लॅब नाहीत. तसेच त्यासाठी आपण बी प्लॅन तयार केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर लोकांनी ऐकलं आणि ते जर घराबाहेर निघाले नाहीत तर या लॅबची आणि बेड्सची गरज आपल्याला भासणार नाही असेही ते म्हणाले.