Coronavirus : IMA चे अध्यक्ष डॉ. जी.ए. जयालाल यांनी दिला महत्वाचा सल्ला, म्हणाले – ‘…तर आणि तरच तिसर्‍या लाटेपासून बचाव शक्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात आलेली कोरोनाचा दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून देशात चार लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र, आता नवीन रुग्णांची संख्या 3 लाखांच्या आत आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी होत असताना मृत्यूची संख्या वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती झाली आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळं होणारे नुकसान टाळण्यासाठी, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) अध्यक्ष डॉ. जी.ए. जयालाल यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.

देशात गेल्या 24 तासांत म्हणजे मंगळवारी (दि.18) दिवसभरात आतापर्यंतची उच्चांकी मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात मंगळवारी 4 हजार 529 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. या परिस्थितीतून बाहेरपडण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे लसीकरण, असं मत जयालाल यांनी व्यक्त केले आहे. आपण मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचं लसीकरण करायला हवं. तसं न केल्यास तिसऱ्या लाटेपासून आपला बचाव होऊ शकणार नाही, असा धोक्याचा इशारा जयालाल यांनी दिला आहे.

मोठ्या समुहांचं लसीकरण वेगाने करायला हवं. त्यासाठी केंद्र सरकारनं अधिकाधिक लसी खरेदी करायला हव्यात. सरकारनं घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची सुविधा सुरु करायला हवी. देशात आतापर्यंत 18 कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे. हा आकडा वेगाने वाढायला हवा असे देखील डॉ. जयालाल यांनी सांगितले.