Coronavirus Impact : मोसमी फळे आणि शीतपेये विक्रेत्यांची ‘हंगामी’ कमाई बुडाली ! पुण्याचे विस्कटलेले अर्थकारण भाग – 5

पुणे (राजेंद्र पंढरपुरे) – यंदाच्या कोरोनाच्या लाटेत आंबा, द्राक्ष अशी मोसमी फळे आणि उन्हाळ्यात जास्त प्रमाणात मागणी असणारे आइस्क्रीम, शीतपेये यांच्या विक्रीला जाम खीळ बसली.

उन्हाळ्याच्या सुरुवातीला द्राक्षाचा हंगाम सुरु होतो आणि उन्हाळा मध्यावर आला की अक्षय्य तृतीयेपासून आंबा विक्री जोरदार सुरु होते. यंदा या हंगामातच कोरोनाची भिती आणि त्या दरम्यानच टाळेबंदी यामुळे अगदी सुरुवातीच्या काळात द्राक्ष बाजारात असलेले चांगले वातावरण नंतर तो हंगाम संपला तरी कळले नाही. मार्च महिन्याच्या सुरुवातीला हातगाड्यांवर, फळांच्या दुकानात द्राक्षांचे घड च्या घड दिसत होते. द्राक्षांना मागणीही होती. भरत नाट्य मंदिराजवळ एका द्राक्ष विक्रेत्याने आपली हातगाडी द्राक्षाच्या घडांनी अतिशय सुंदर सजवली होती. वर्तमानपत्र, टीव्ही वाहिन्यांवर त्या हातगाडीवाल्याचे खूप कौतुकही झाले. बोलबाला झाला. द्राक्ष खरेदीसाठी गर्दी होऊ लागली.

परंतु अचानक १३ मार्चला कोरोनाचा पहीला रुग्ण आढळला. या संसर्गाच्या आजाराची लक्षणे म्हणजे सर्दी, खोकला, ताप येणे. ही लक्षणे समजल्यावर लोकांनी आंबट द्राक्षे खाणेच बंद केले. स्वाभाविकच द्राक्षांची खरेदीही एकदम थांबली आणि १८ मार्चला लॉकडाऊन जाहीर झाल्यावर हे हातगाडीवाले दिसेनासेच झाले. हंगामी फळांची हातगाडीवर विक्री करणारे विक्रेते वर्षानुवर्षे हा व्यवसाय करीत आहेत. अशांची खूप मोठी संख्या पेठांमध्ये आहेच तसेच आलीकडे काही वर्षांपासून ते उपनगरांमधूनही दिसत आहेत. कोरोनामुळे आधी फळं विक्री कमी झालीच त्यात टाळेबंदीमुळे तर ही विक्री थांबलीच. दरम्यान, वाहतूक बंदीमुळे सांगली, नाशिक भागातून द्राक्ष येणेही बंद झाले.

द्राक्षाच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला तसेच पुण्यातल्या विक्रेत्यांनाही बसला. आंब्याची अवस्थाही अगदी अशीच झाली. यंदा रत्नागिरीत आंब्याचा सिझनच उशीरा सुरु झाला. वाहतूकबंदीमुळे सुरुवातीला आंब्याची फळे पुण्याच्या बाजारात आलीच नाहीत. रत्नागिरीत झाडांवरून आंबे उतरविण्यासाठी मजूर मिळत नव्हते त्यामुळे आंब्याची पुढची प्रक्रिया होऊन आंबा पुणे-मुंबईच्या बाजारात कधी जाणार याची विवंचना आंबा बागायतदारांना होती आणि पुण्यातील विक्रेते मात्र आंबा आयातीची आशेनी वाट पाहात होते. कोकणातून आंबे आणून, त्यांची विक्री करून वर्षभराची विशेष कमाई करुन ठेवणारा एक वर्ग पुण्यात आहे.

पण, विक्रीसाठी कोकणातून पुरेशा प्रमाणात आंबा पुण्यात आलाच नाही. त्यातच आंब्याबद्दल एक असा गैरसमज पसरला होता की, विक्रीपूर्वी आंबा हे फळ खूपजणांकडून हाताळले जाते त्यामुळे कोरोनाची शक्यता वाढते. लोकांमधील ही अनाठायी भिती काढण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी आणि फळं विक्रेत्यांनी केला. पण, त्यात बराच कालावधी गेला. कोकणातील एका बाजारसमितीला पुण्यातील एका तंत्रज्ञाने ऑनलाईन आंबा विक्रीसाठी एक अँप तयार करुन दिले त्यावर ऑर्डर्स नोंदवल्याही गेल्या. पण, संबंधित बाजार समिती पुण्याकडे आंबा पाठवूच शकली नाही त्यामुळे सर्व ऑर्डर्स रद्द करून ज्याचे त्याला पैसे परत करण्याची वेळ आली यावरुन लक्षात येते की पुण्यात आंब्याची उलाढाल वीस ते पंचवीस टक्केच झाली असावी.

सासवड परिसरात अंजीर बागायतदार आहेत. त्यांचा माल पुण्यात विक्रीला येतो. यंदा वाहतूक बंदी असल्याने अंजीरे उत्पादनाच्या ठिकाणीच शब्दशः मातीमोल झाली. ती विक्रीसाठी बाजारपेठेत आलीच नाहीत.

ईदच्या दिवशी खजूर आणि सुकामेव्याची विक्री प्रचंड प्रमाणात होते. यंदा वाहतूक बंद असल्याने त्याचा साठाच करता आला नाही. परिणामी, सुकामेवा विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागला.

द्राक्ष, आंब्या, अंजीर पाठोपाठ उन्हाळ्यात आइस्क्रीम, मस्तानी, लस्सी, कैरीचे पन्हे, कोकम सरबत, लिंबू सरबत आणि अन्य शीतपेयांची विक्री दहा टक्के सुद्धा झाली नाही. शीतपेयांना मागणी नसल्याने वस्तूंची ने-आण करणारे डिलिव्हरी बॉय, मेटडोअर, टेम्पोचे चालक यांचे काम थांबले. वितरकांनीही त्यांना कामावरुन कमी केले. आइस्क्रीम पार्लर मधील कामगारांच्या नोकऱ्या गेल्या.

भाडेतत्त्वावर जागा घेऊन आइस्क्रीम पार्लर्स चालविणाऱ्यांवर मोठी आफत आली. एका आइस्क्रीम विक्रेत्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर पार्लरमध्ये चक्कपैकी चहाची विक्री सुरु केली आणि जागेचे भाडे भागविण्याचा प्रयत्न केला. शीतपेय, आईस्क्रीम यासाठीची मागणी अजूनही घटलेलीच आहे. सध्या पावसाळा आणि नंतर थंडी यामुळे या पदार्थांना किती मागणी राहील याविषयी शंका आहे.