Coronavirus Impact : IPL च्या तिकीट विक्रीबाबत राज्य सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यभरात कोरोना व्हायसर पसरत असून गर्दी टाळण्यासाठी राज्यात आयपीएल सामन्यांसाठी तिकीट विक्री होणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत आयपीएलबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून कुठल्याही स्वरूपात गर्दी होऊ नये यासाठी आयपीएलची तिकीट विक्री होऊ नये, हा निर्णय करण्यात आला असल्याचे टोपे यांनी सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी टाळणे, संसर्ग टाळणे महत्वाचे आहे. आता महाराष्ट्रात शासकीय कार्यक्रम होणार नाहीत. राजकीय सभा, मेळावे, धार्मिक यात्रा टाळाव्यात अशा सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी दिल्या आहेत. आज विधानभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व जिल्ह्याधिकारी बैठक घेतली. त्यामध्ये राज्यातील स्थितीचा आढावा घेतला गेल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळांच्या बाबतीत निर्णय घेतला जाणार आहे.

सद्यस्थितीत राज्यात कोरोनाचे 12 रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यापैकी 9 रुग्ण पुण्यातील, दोन मुंबई तर एक रुग्ण नागपूरमधील आहे. या सर्व रुग्णांची तब्येत बरी आहे. राज्यामध्ये कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी लॅब वाढवाव्यात यासाठी केंद्र सरकारशी बोलणे झाले आहे. त्यानुसार मुंबई आणि औरंगाबादला परवानगी मिळाल्यास टेस्टिंग होऊ शकेल. दरम्यान, रक्त तपासणाीसाठी राज्यातील तीन लॅबवर मोठा ताण वाढला आहे. अशी माहिती माहिती टोपे यांनी दिली.

राज्यातील यात्रा आणि जत्रा तसेच सामूदायिक कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करा. कोरोनाच्या संशयित रुग्णांची ओळख, त्यांचे विलगीकरण अशा बाबींवर भर द्यावा. शहरातील पर्यटन कंपन्यांना पुढील काही दिवस बुकींग न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जी मुख्य शहरे आहेत तिथल्या टुर ऑपरेटर्सनी शहरातील परदेशी गेलेल्या पर्यटकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी. जे पर्यटक परतणार आहे त्यांनी स्वत:हून घरीच 15 दिवस स्वतंत्र रहावे. कुटुंबात अथवा समाजात मिसळू नये असा संदेश द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत म्हणून नागरिकांनी घाबरुन तपासणीसाठी रांगा लावू नये. त्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही टोपे यांनी केले.