संचारबंदीच्या काळात भाजी विक्री विलगीकरणाचा ‘तळेगाव पॅटर्न’ राज्यभर राबविण्यात यावा : आमदार शेळके

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  संचारबंदीच्या काळात वॉर्डनिहाय भाजीपाला व फळविक्रीची व्यवस्था करून कोठेही गर्दी होऊ न देण्याचा यशस्वी प्रयोग तळेगावमध्ये राबविण्यात आला असून, भाजी विक्री विलगीकरणाचा ‘तळेगाव पॅटर्न’ राज्यभर राबविण्यात यावा, अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

आमदार शेळके यांनी सोमवारी (२३ मार्च) तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सभागृहात कोरोना प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी बैठक घेतली. प्रत्येक वॉर्डामध्ये भाजीपाला व फळविक्रीसाठी स्टॉल उभारावेत, घरपोच औषध सुविधा, घरपोच किराणा माल सुविधा उपलब्ध करून द्यावी व संचारबंदीच्या काळात पोलिस व शासकीय यंत्रणेच्या मदतीसाठी स्वयंसेवकांचे पथक नेमावे आदी सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत.

बैठकीतील निर्णयानुसार प्रथम औषध फवारणी करून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या नियोजनाखाली शहरात १६ ठिकाणी भाजीविक्री व फळविक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी चार भाजी विक्रेते व एक फळविक्रेता यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांना मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. भाजी व फळांबरोबर या ठिकाणी सॅनिटायझरही विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

एका स्टॉलसमोर एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक थांबणार नाहीत याची काळजी घेण्यात येत आहे. ग्राहकांना भाज्या व फळे निवडून घेण्याची मुभा नाही. विक्रेत्यांना चढ्या भावाने भाजी व फळे विकण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना ठराविक अंतरावर उभे राहण्यासाठी रस्त्यावर तसे पट्टे (पेंटिंग) मारण्यात आले असून, त्याचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.