Coronavirus Impact : बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याने पुण्याचा आर्थिक कणा मोडला – विस्कटलेले अर्थकारण भाग – 2

पुणे (राजेंद्र पंढरपुरे) – महानगर म्हणून आकारात येत असलेल्या पुणे शहराची आर्थिक भिस्त बांधकाम क्षेत्रातील उलाढालीवर आहे. नोटाबंदीपासून बांधकाम क्षेत्राला लागलेल्या धक्क्यातून आत्ता कुठे सावरले जात असताना अचानक उद्भवलेल्या कोरोना संसर्गामुळे हा व्यवसाय पुन्हा पिछाडीवर गेला आणि परिणामतः शहराचा आर्थिक कणा मोडला.

बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. यात अनेक घटक सामावलेले असतात. जमीन मालकाला पहिला लाभ होतो. सिमेंट, पोलाद, वाळू, खडी, लाकूड, वीट कंपन्या या बाजारपेठा लाभार्थी असतात. पाण्याच्या टाक्या, पाईप या वस्तूंची मागणी खूप असते. वाहतुकीसाठी टेम्पो, ट्रक्स, तसेच बांधकामासाठी जेसीबी मशीन्स, कॉंक्रिटीकरणाचे मशीन या साहित्याला मागणी वाढते. आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, जलतज्ज्ञ, वकील अशा प्रोफेशनल्सना उत्पन्न मिळते. रंगकाम करणारे तसेच मजूर आणि मजूर पुरविणारे ठेकेदार, लिफ्टमन, प्लंबर यांना बांधकामात लाभ होतो. वित्तीय संस्था, बँका यांचे व्यवहार बांधकाम क्षेत्रावर अवलंबून असतात. महापालिका, राज्य सरकार यांना वेगवेगळे शुल्क मिळतात. सुरक्षा रक्षकांना रोजगार मिळतो. बांधकामाच्या ठिकाणी चहा, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या चालू रहातात. बांधकाम पूर्ण झाल्यावर इंटिरिअर डिझायनर्सना काम मिळते. वास्तूशांतीच्या निमित्ताने पुरोहित वर्गाला काम मिळते. एका इमारतीच्या बांधकामाच्या निमित्ताने एवढ्या क्षेत्रांमध्ये आर्थिक उलाढाल होते. अशा शेकडो इमारतींचे काम पुण्यात चालू होते. या संकट काळात ते मंदावले आणि शहराच्या आर्थिक उलाढालीला त्याची मोठी खीळ बसली.

जमीन खरेदी-विक्री करणारे दलाल (रिअल इस्टेट एजंट) हा घटक गेल्या १२, १५ वर्षात वाढला. पुणे शहर आणि त्याच्या आसपास भोर, मुळशी, मावळ, सासवड या तालुक्यांमध्ये जमीन विक्री हा किफायतशीर धंदा झाला. या धंद्यात दलाल तयार झाले. जमीनीसाठी गिऱ्हाईक आणणे, शासकीय पातळीवरची कागदपत्र तयार करणे, वकील नेमणे अशा स्वरुपाची कामें शहरातील अनेकजण करु लागले. अलिकडे अनेक कारणाने जमीनींचे व्यवहार मंदावले होतेच, कोरोनामुळे हे व्यवहार जवळजवळ बंदच आहेत. काही गरजूंना जमीन विकायची आहे. पण, आज त्याला गिऱ्हाईक नाही. त्यामुळे रिअल इस्टेट एजंट त्यांना मदत करणारे वकील यांच्याकडील पैशांचा ओघ आटलेला आहे. नोटरी, झेरॉक्स वाले, स्टँप पेपर विक्रेते, टायपिस्ट, असे छोटे, छोटे घटकही त्यावर आवलंबून होते. त्यांचेही अर्थकारण बिघडले.

या बांधकाम क्षेत्राभोवती राजकारण, प्रशासन, गुन्हेगारी क्षेत्र फिरत असते. उलाढाल घटल्याने त्याही क्षेत्रांवर परिणाम झाला आहे.गेल्या चार महिन्यात लोकांची क्रयशक्ती क्षीण झाली आणि नवीन फ्लॅट घेण्यासाठी गिऱ्हाईक मिळेनासे झाले. बांधकाम पूर्ण होऊनही फ्लॅटस रिकामे पडून आहेत अशा बातम्या वृत्तपत्रांतून अधूनमधून प्रसिद्ध होत असतात. आगामी काळ अधिकच कठीण असल्याची मते तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत, प्रत्यक्ष व्यवहारांत तशी चिन्हे दिसत आहेत. ही परिस्थिती अधिक बिकट झाली,पुढील वर्ष, दोन वर्षात आर्थिक क्षेत्राला गती मिळाली नाही तर हे क्षेत्र अधिकच ठप्प होईल.

सरकारला कर रुपाने पैसा मिळवून देणारं, हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचे साधन असणारं आणि अनेक व्यावसायिकांना आर्थिक उलाढालीची संधी मिळवून देणारं हे क्षेत्र कोरोना संकट काळात ठप्प झाले आहे. त्याबरोबरच शहराचे अर्थचक्रही रुतून बसले आहे.