Coronavirus Impact : ऑनलाईन शिक्षणाचा फंडा, गरीब विद्यार्थ्यांचा झाला वांदा !

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोरोना महामारी मुळे संपुर्ण जगात महाभयानक संकट निर्माण झाले असुन या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वच देशांची पुरेवाट होत असतांना शिक्षण क्षेत्रावरही याचा मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे.

भारतात मार्च महिन्यात लाॅकडाऊन सुरू झाले. कोरोना या आजाराला रोखण्याकरिता शासनाने आटोकाट प्रयत्न केले व अजुनही करित आहे. या कोरोना मुळे निर्माण झालेल्या लाॅकडाऊन मुळे व त्यासाठी पाळावयाच्या नियमामुळे शिक्षण क्षेत्राची मोठी नासाळी झाली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होवु नये म्हणुन शासनाने ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश दिले. अनेक शाळा, महाविद्यालयामध्ये हा उपक्रम सुरू झाला.परंतु ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थांकडे भ्रमणध्वनी संच नसल्यामुळे व त्यांची विकत घेण्याची ऐपत नसल्यामुळे ते विद्यार्थी या उपक्रमापासुन वंचित रहात आहे.अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने विशेष कार्यक्रम हाती घेने आवश्यक आहे. नाही तर ऑनलाईन शिक्षण पद्धत हि केवळ श्रीमंतांच्याच मुलांसाठी आहे असा समज गरीब विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल.

शाळा केव्हा चालू होईल हे अजूनही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे अभ्यास करणे परिक्षा देने या बाबत विद्यार्थी संभ्रमात आहे. अनेक विद्यार्थ्यांची शिक्षणाची लिंक तुटलेली आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे भविष्यात मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अडचणीची ठरणारी ऑनलाईन पद्धत बदलवून पर्यायी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.