Coronavirus Impact : जिल्ह्यातील पर्यटन थांबलं तर शहरातील लॉजेस ओस पडले, यात्रा कंपन्यांचा व्यवसाय धोक्यात ! पुण्याचे विस्कटलेले अर्थकारण भाग – 6

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना साथीच्या भितीने आणि सोशल डिस्टन्सिंग सांभाळण्याच्या अपरिहार्यतेने लोकांच्या वावरावर मर्यादा आल्या. जिल्हाबंदी, वाहतूक बंदी लागू झाल्याने यात्रा कंपन्या, ट्रॅव्हल कंपन्या, शहरातील लॉजेस यांचा व्यवसाय शब्दश: ठप्प झाला आहे.

एप्रिल, मे महिन्याच्या काळात शाळा, कॉलेजेसना सुट्टी असल्याने लोकांचा सहलीचा मूड असतो. थंड हवेची ठिकाणे, समुद्र किनारे, तीर्थक्षेत्रे अशा ठिकाणी प्रामुख्याने पर्यटन केले जाते. अलीकडे थायलंड, सिंगापूर, मलेशिया, जर्मनी, अमेरिका, मॉरिशस, बाली बेटे, श्रीलंका या ठिकाणीही सहली काढल्या जातात. भारतातही अनेक पर्यटन स्थळे आहेत. तिथे सहली काढा. तेथील पर्यटन क्षेत्राला वाव देऊन तिथल्या लोकांचे आर्थिक बळ वाढवा असे पंतप्रधान मोदी यांनी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात जनतेला आवाहन केले होते. त्याचाही परिणाम होऊन पर्यटन वाढले.

गेल्या काही वर्षांपासून सर्व प्रकारच्या पर्यटनाच्या नियोजनासाठी यात्रा कंपन्या, ट्रॅव्हल कंपन्या निर्माण झाल्या, त्यांची संख्या वाढली. या कंपन्यांनी पुण्यात ऑफिसेस थाटली, स्टाफ नेमला. शिवाय आपापले बस चालक, क्लिनर, गाईड, व्यवस्थापक, टूर डिझायनर नेमले आणि एक उद्योग व्यवसाय आकाराला आला. टुरिस्ट कार्सचा धंदाही फोफावला त्यातून ड्रायव्हर, नोंदणी कारकून यांना रोजगार उपलब्ध झाला. शहराच्या अर्थकारणातील मोठी साखळी या व्यवसायाभोवती आहे. त्यामध्ये गाड्या दुरुस्तीची गॅरेजेस, पेट्रोल पंप, लॉजेस, केटरर्स, असे घटकही सामावलेले आहेत.

पुण्यातून परगांवी किंवा परदेशी जाणारे पर्यटक जसे आहेत तसेच बाहेरुन पुण्यात येणारे पर्यटकही आहेत. पुण्यात शनिवार वाडा, दगडूशेठ गणपती, केळकर संग्रहालय, पर्वती तसेच अनेक ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी पर्यटक येतात. शिर्डीच्या साईबाबांचे दर्शनासाठी निघालेले मुंबई आणि गुजरातमधील भाविक पुण्यात येऊन दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन मग मार्गस्थ होतात. याकारणाने पुण्यात मोठी आर्थिक उलाढाल होते, चातुर्मासात धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी यात्रा कंपन्या तशा टुर्स आयोजित करतात. अलीकडे आयटी सेक्टरमुळे देशविदेशातील तंत्रज्ञ, मार्केटिंग प्रतिनिधी व्यवसायानिमित्त पुण्यात येतात. येथील पर्यटन स्थळांना भेटी देतात. पर्यायाने रिक्षाचालक, लॉजेस, मिठाईवाले यांचा धंदा जोरात होतो. परंतु टाळेबंदी आणि साथीची भिती यामुळे हे क्षेत्रच ठप्प झाले. धंदा बुडाला, रोजगार बुडाला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, स्वच्छता, गर्दी टाळणे अशा अनेक कारणांनी पुण्यातून बाहेर जाणाऱ्या आणि पुण्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमीच राहाणार आहे. ही स्थिती किती काळ राहील? याचा अंदाज नाही. सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदी असल्यामुळे यात्रा, सहली अशा गोष्टींना प्राधान्यही दिले जाणार नाही. एकीकडे आर्थिक कारण, दुसरीकडे कोरोनाची भिती. त्यातून या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची खूप पंचाईत झालेली आहे. किंबहुना कोरोनाचे पूर्ण उच्चाटन होईपर्यंत पर्यटन टाळण्याकडेच लोकांचा कल राहील, पुढील काही काळपर्यंत या व्यवसायात मंदीच राहील.

क्रमश:…..