Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं लग्न समारंभात थाटमाट नाहीच, अनेकांचा रोजगार बुडाल्यानं बेरोजगारीत लक्षणीय वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कपडे, सोन्या-चांदीचे दागिने खरेदी, मानपान, हॉल, वऱ्हाडी मंडळींची ने-आण करण्यासाठी ट्रॅव्हल बस, मंडप, देवदेवतांचे दर्शन, जेवणावळी, मित्र-मैत्रिणींना पार्टी, वधू-वरांच्या मेकअपसाठी ब्यूटीशियन असा देखणा सोहळा लग्नसमारंभामध्ये पाहायला मिळतो. मात्र, कोरोनाच्य विषाणूमुळे लग्नसोहळे थांबले, तर काहींनी अगदी चार-पाच वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीनेच लग्नसोहळे उरकल्याचे पाहायला मिळाले.

लॉकडाऊनच्या 45 दिवसांनंतरही कोरोनाची महामारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये आता भीती वाढली आहे. कोरोनाच्या सावटाचा लग्नसोहळ्यावर अवलंबून असणाऱ्या मंडप सजावटकार, छायाचित्रकार, वाढपी, आचारी, ट्रॅव्हल्स बसेस, वाजंत्री, डिजे अशा सर्वच व्यावसायिकांच्या कमाईवर झाला आहे. तिसऱ्यांदा लॉकडाऊन केल्यानंतर काही शिथीलता आणली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, कोरोनाबाधितांची आणि मृतांचा आकडा वाढू लागल्यामुळे रविवारपासून (दि. 10 मे) पुणे शहरामध्ये पत्रे ठोकून कडकडित लॉकडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे सर्वांचीच निराशा झाली आहे.

आपल्याकडे जानेवारी ते मे दरम्यानच्या कालावधीमध्ये लग्नाचे मुहूर्त असतात. मात्र, त्यातूनही अलीकडे दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर म्हणजे मार्चअखेर ते जूनपर्यंत लग्नसराई जोरात असते. मात्र, यावर्षीच्या लग्नसोहळ्याला कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे गालबोट लागले. मात्र, अवघ्या चार-पाच वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने लक्ष्न सोहळे उरकले. तर काही चक्क पोलीस स्टेशन आणि पोलिसांना घरामध्ये बोलावून लग्नबंधनात अडकले. त्यामुळे लग्नसराईसाठी लागणाऱ्या सर्वच साहित्य पुरविणाऱ्या घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

लग्नसराईसाठी व्यावसायिकांनी मंडपासाठी लागणारे कापड, विविध प्रकारचे आकर्षक सेट, इलेक्ट्रॉनिक साहित्य आदी वस्तूंची खरेदी करून ठेवली होती, तर काही ठिकाणांहून मिळालेली कामे पूर्ण करण्यासाठी साहित्य भाडय़ाने घेतले होते. त्यांना ही आगाऊ रक्कम दिली आहे. तर ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांच्याकडून लग्न सेट उभारण्यसाठी घेतलेली आगाऊ रक्कमही परत करण्याची नामुष्की ओढवली आहे. लग्नसोहळ्याचा हंगाम वाया गेल्याने कमाई नाही आणि नोकरांना पगार कसे द्यायचे असा प्रश्न पडल्याचे एका मंडप सजावटकाराने सांगितले.

लग्न समारंभामध्ये जेवणाचा मेनू तयार करण्यासाठी आणि ते वाढण्यासाठी आचारी आणि वाढपी मंडळींना मोठी मागणी असते. ही मंडळी ड्रेसकोडमध्ये असल्याने त्यांचा रूबाब काही न्याराच दिसतो. मात्र यावर्षी हा लग्न समारंभ झाले नाहीत, त्यामुळे हा सोहळा कुठे पहायला मिळाला नाही. लग्नसराईमध्ये रोजंदारी म्हणून मोठी कमाई होते. मात्र, लॉकडाऊनमुळे या व्यवसायाची गाडीच कोलमडली आहे.

शहर असो खेडे या ठिकाणी लग्नाची वरात तरुणाईसाठी महत्त्वाची असते. कारण वरातीमध्ये डिजेच्या तालावर तरुणाई बेधुंद थिरकते. तसेच, नटूनथटून वावरणाऱ्या महिला वर्गाची धांदल, वरबाप आणि वरमाई यांची धांदल टिपण्यासाठी छायाचित्रकाराची लगबगसुद्धा लक्ष वेधून घेते. तसेच, लग्नाच्या आठवणी नव्याने जागृत करण्याची एकच सोय म्हणजे सोहळ्याची काढण्यात आलेली छायाचित्रे. त्यामुळे छायाचित्रकारांना विविध संधी मिळतात. मात्र, लॉकडाऊनमुळे मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महत्त्वाचे महिने वाया गेले आहेत. या दिवसांत छायाचित्रकारांसाठी होणारी कमाई पूर्णपणे थांबली आहे. यात लग्नसमारंभ आणि विवाहपूर्व चित्रीकरण (प्रीवेडिंग शूट) रद्द झाले आहे. त्यामुळे टाळेबंदी उठवल्यानंतर काय, असा प्रश्न छायाचित्रकारांसमोर आहे.

लग्नसराईमध्ये मानपानासाठी सोन्याचे दागिने आणि कपड्यांची मोठी खरेदी होती. या वर्षीच्या लग्नसमारंभासाठी ही खरेदीच झाली नाही. कपडे आणि सोन्याची दुकाने बंद असल्याने तेथील नोकरदारांवरही वाईट प्रसंग आला आहे. लग्नामध्ये महिलांसाठी बांगड्यांचा साजही तितकाच महत्त्वाचा असतो. तसेच अलीकडे वधू-वरांसाठी ब्यूटीपार्लर महत्त्वाचे मानले जाते. मात्र, लग्नसमारंभच ठप्प झाल्याने त्यांचेही व्यवसाय बंद ठप्प झाले आहेत.