‘कोरोना’चा प्रतिबंध करण्यासाठी कार्यरत कर्मचा-यांच्या पश्चात कुटुंबाला मिळणार 1 कोटी व वारसाला ‘मनपा’त नोकरी

पिंपरी : पोलीनामा ऑनलाइन – “कोरोना” COVID – 19 विषाणूच्या प्रतिबंधासाठी नेमणूक केलेल्या कर्मचा-यांना १ कोटी विमा सुरक्षा कवच व वारसदाराला मनपा सेवेत नोकरी देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर माई ढोरे आणि पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. सद्यस्थितीत जगभर “कोरोना” COVID – 19 विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये “कोरोना” COVID – 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य तसेच इतर विभागातील ब-याच कर्मचा-यांच्या नेमणूका केलेल्या आहेत. अशावेळी हे नेमणूक केलेले कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी दिवसरात्र काम करत आहे.

कोरोनाचा प्रतिबंध करत असताना नेमणूक केलेल्या कर्मचा-यांचा उदा. वैद्यकीय अधिकारी, नर्सेस व इतर स्टाफ यांचा कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या व संशयीत रुग्णाशी थेट संपर्क येत असतो. त्याचप्रमाणे सर्व्हेसाठी नेमणूक केलेल्या कर्मचा-यांचा देखिल थेट संपर्क येवू शकतो. त्यामुळे एखादया कर्मचा-याला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी या कर्मचा-यांना योग्य असे सुरक्षा कवच व प्रशासनाचा आधार असणे अत्यंत आवश्यक आहे.

सबब पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ज्या ज्या कर्मचा-यांच्या “कोरोना” COVID – 19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नेमणूका करणेत आलेल्या आहेत त्यांचे बाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्यांना महानगरपालिके मार्फत सुरक्षा कवच म्हणून दुर्घटने पश्चात एक कोटी रक्कम देणे व त्यांचे वारसास मनपा सेवेत नोकरी देणे अशा प्रकारची योजना तातडीने लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करुन त्यास संमती मिळाली असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे, सभागृह नेता नामदेव ढाके यांनी प्रसार माध्यमांना दिली.