Coronavirus : दिल्लीसह पुण्यात देखील ‘तिप्पट’ किंमतीला विकलं जातंय ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’ बाजारातून ‘गायब’, ‘काळाबाजार’ होतोय ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चीनमध्ये फोफावलेला कोरोना व्हायरस आता भारतात येऊन धडकला आहे. भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 29 झाली आहे. दिल्ली, हैदराबाद, केरळ या राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आता लोकांमध्ये भीतीचे सावट आहे. त्यामुळे लोक खबरदारी म्हणून मास्क आणि सॅनिटायझरची खरेदी करत आहे.

दिल्लीत कोरोनाच्या भीतीने मागील 2 दिवसांपासून लोकांनी मेडिकलमधून मास्क आणि सॅनिटायझर घेण्यासाठी गर्दी केली आहे. यामुळे मास्क आणि सॅनिटायझर्सची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने किंमतीत देखील मोठी वाढ झाली आहे. सॅनिटायझर तर मेडिकलमधून गायबच झाले आहेत. तर मास्क तीन पट किंमतीला विकले जात आहेत.

दिल्लीसह पुण्यात देखील हीच अवस्था आहे. पुणे शहरात देखील लोकांनी खबरदारी म्हणून मास्क आणि सॅनिटायझर घेण्यासाठी मेडिकलवर गर्दी केली आहे. परंतु मागणी वाढल्याने या दोन्ही वस्तूंच्या किंमती जास्तच महागल्या आहेत. जे मास्क 50 ते 60 रुपयांनी मिळत होते तेच मास्क आता 100 ते 150 रुपयांना विकले जात आहे. एवढेच नाही तर या मास्कचा काळाबाजार सुरु झाला आहे.

मागणी वाढल्याने काही ठिकाणी मास्क आणि सॅनिटायजर्सचा तुटवडा भासू लागला आहे आणि ज्या ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझर्स आहेत तेथे ते किंमतीपेक्षा जास्त दराने विकले जात आहेत. तुटवडा भासत असल्याने लोक मिळेल तेथून मास्क, सॅनिटायझर्स महागड्या किंमतीला खरेदी करत आहेत.

पुण्यासह मुंबईत देखील अशीच परिस्थिती आहे. तेथे देखील मास्क 300-300 रुपयांना विकले जात आहे. पुणे मुंबईसह राज्यातील इतर शहरात देखील हीच परिस्थिती आहे. याचा फायदा मेडिकल चालकांना होत आहे परंतु ग्राहकांची लूट होत आहे. असे असले तरी लोक नाइलाजास्तव, पर्याय नसल्याने मास्क, सॅनिटायझर खरेदी करताना दिसत आहेत.