दिल्लीमध्ये लवकरच 1 लाखापर्यंत पोहचू शकते ‘कोरोना’बाधितांची संख्या, 15 हजार बेडची पडणार गरज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना संक्रमितांची प्रकरणे झपाट्याने वाढत असून गेल्या एका आठवड्यात यात प्रचंड वाढ झाली आहे. काही राज्यात प्रकरणे १० पटीने वाढली आहेत. वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जगात या आजाराने सर्वाधिक पीडित देशांच्या यादीत भारत आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. येथे युरोपियन देश इटली आणि स्पेनपेक्षा संसर्गाची प्रकरणे जास्त झाली आहेत. देशात संक्रमणाची प्रकरणे अडीच लाखाच्या जवळपास पोहोचली आहेत, तर मृतांची संख्या सात हजारच्या जवळपास पोहोचली आहे.

सीएमचा दिल्ली मेडिकल असोसिएशनला इशारा
दिल्लीतील अनेक रुग्णालयांमध्ये कोविड-१९ च्या रुग्णांना भरती केले जात नाहीये. या तक्रारीदरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली मेडिकल असोसिएशनला इशारा दिला आहे.

असोसिएशनच्या वतीने रविवारी असे सांगितले गेले आहे की, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. परंतु त्यांचे कौतुक करण्याऐवजी दररोज सरकारकडून नवीन फर्मान काढले जात आहेत. असोसिएशनने या प्रकरणात सर गंगाराम रुग्णालयाविरोधातील एफआयआरला निंदनीय म्हटले आहे. सीएम केजरीवाल यांनी शनिवारी दिल्लीतील काही रूग्णालयात बेडच्या ब्लॅक मार्केटिंगचा संदर्भ देत अशा रुग्णालयांना कडक इशारा दिला होता, त्यानंतर असोसिएशनचे हे विधान पुढे आले आहे.

दिल्लीत १ लाखापर्यंत पोहोचतील संक्रमणाची प्रकरणे !
जूनच्या अखेरपर्यंत दिल्लीत कोरोना संक्रमितांच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे. पाच सदस्यीय समितीच्या म्हणण्यानुसार, येथे जूनअखेरपर्यंत संक्रमणाची प्रकरणे १ लाखांच्या आसपास पोहोचू शकतात. त्यानंतर आणखी १५,००० बेडची आवश्यकता असू शकते.