Coronavirus : देशात 1,86,000 हून अधिक जणांचे ‘सॅम्पल’ घेतले, 4.3 % पॉझिटिव्ह, ‘कोरोना’बाधितांची संख्या 8000 पार

वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 86 हजाराहून अधिक जणांचे सॅम्पल घेण्यात आले असून त्यापैकी 4.3 टक्के सॅम्पल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आता कोरोनाबाधितांची संख्या 8356 वर जाऊन पोहचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत 716 कोरोनाबाधित रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 34 जणांचा मृत्यू झाला आहे. दररोज 15 हजाराहून अधिक टेस्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

राजस्थान आरोग्य विभागानुसार आज कोरोनाचे 96 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये जयपूरमधील 35 रूग्णांचा समावेश आहे. आता राजस्थानमधील कोरोनाबाधितांची संख्या 796 वर जाऊन पोहचली आहे. हरियाणामध्ये 179 बाधित आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळं 273 जणांचा बळी गेला आहे. आयसीएमआरनुसार दररोज 15747 नमुन्यांची तपासणी केली जात आहे. त्याबाबत डॉ. मनोज मुरेकर यांनी माहिती दिली आहे. कोरोनाबाधित रूग्णांपैकी सुमारे 20 टक्के रूग्णांना अति दक्षता विभागात (आयसीयु) मध्ये ठेवण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1900 वर पोहचला आहे.