Coronavirus : भारतासाठी डोकेदुखी ठरला जुलै महिना, केवळ महिन्याभरातच समोर आले 11 लाख नवे पॉझिटिव्ह, 19122 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मार्चपासून भारतात कोरोना विषाणूचा कहर सुरु असला तरी जुलैमध्ये त्याने आपले भयानक रूप दाखवले आहे. केवळ जुलैमध्ये देशभरात 11 लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याचवेळी, कोरोना विषाणूच्या एकूण घटनांकडे बघितले तर ही आकडेवारी 16 लाखांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी कोरोनाने भारतातील सर्व रेकॉर्ड तोडले आणि एकाच दिवसात 55 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदविण्यात आली. अशाप्रकारे 31 जुलै पर्यंतच्या आकड्यांना एकत्र केले तर जुलै महिन्यात कोरोना विषाणूचे 11.1 लाख पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आले आहेत, तर 19122 लोक मरण पावले आहेत.

मागील महिन्याच्या आकडेवारीची तुलना केल्यास जुलैमध्ये सुमारे 2.8 पट अधिक घटना घडल्या आणि 1.6 पटीने मृत्यूची नोंद झाली. गेल्या महिन्यात जूनमध्ये कोरोनाचे जवळपास 4 लाख प्रकरणे नोंदवण्यात आले आणि 11988 मृत्यूंची नोंद झाली. तर शनिवारी देखील 57 हजारांहून अधिक कोरोना संक्रमित आढळले आहेत, यातून असा अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो की कोरोना अधिक विनाश करेल.

खरं तर, कोरोना विषाणू साथीचे जसजसे दिवस जात आहेत तसतसे त्याचा प्रकोप अजूनच भीतीदायक बनत चालला आहे. जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये जवळपास 7.3 लाख कोरोना प्रकरणे नोंदविण्यात आली. म्हणजेच महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये संसर्गाची गती मागील दोन आठवड्यांपेक्षा थोडी कमी होती. येथे नोंद घेण्यासारखे आहे की कोरोनाने अद्याप भारतात शिखर गाठलेले नाही, असे तज्ञ दावा करीत आहेत.

देशात एका दिवसात कोविड -19 चे सर्वाधिक 55,078 प्रकरणे समोर आल्यानंतर या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या शुक्रवारी 16 लाखांच्या पुढे पोहोचली. याआधी फक्त दोन दिवसांपूर्वी देशात संक्रमणाची 15 लाख प्रकरणे होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार निरोगी लोकांची संख्याही 10,57,805 पर्यंत वाढली आहे.

देशात सध्या कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या वाढून 36,511 झाली आहे. कोरोना विषाणूमुळे मृत्यूच्या बाबतीत भारत जगात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता भारत सोडून फक्त चार देश बाकी आहेत, ज्यात अमेरिका, ब्राझील, ब्रिटन आणि मेक्सिकोचा समावेश आहे. कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत जिथे 156,747 मृत्यू झाले आहेत, तिथे ब्रिटनमध्ये 46,119, ब्राझीलमध्ये 92,568 आणि मेक्सिकोमध्ये 46,688 लोकांचा मृत्यू झाला आहे.