Coronavirus Lockdown : PM मोदींचा ‘लॉकडाऊन’चा आदेश डावलून येडियुरप्पांची समारंभास ‘हजेरी’, भाजप आमदारानं थाटलं मुलीचं ‘लग्न’

बेळगाव : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशच २१ दिवसांसाठी लॉक डाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. असे असताना सगळे नियम धाब्यावर बसवून कर्नाटकातील बेळगावात रविवारी तब्बल ३००० लोकांच्या उपस्थितीत भाजप आमदाराच्या मुलीचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. त्याहीपेक्षा कहर म्हणजे कोरोनाचं संकट टळेपर्यंत लग्न सोहळे आयोजित करु नका असे सांगणारे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा हे देखील या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. आता मुख्यमंत्रीच असे वागत असतील तर आम जनतेने काय करावं असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

भाजपच्या आमदाराचा प्रताप

देशात लॉकडाउन असताना कर्नाटकातील भाजपाचे आमदार महंतेश कवतागिमठ यांनी आपल्या मुलीचं थाटात लग्न लावून दिलं. बेळगावमध्ये रविवारी हा लग्नसोहळा पार पडला. एका इंग्रजी दैनिकानं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. तेथे ड्यूटीवर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांनं सांगितलं. इतक्या मोठ्या संख्येनं कार्यक्रमाला लोक उपस्थित राहणे हा मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा आणि कायद्याचा भंगच होता. पण कळस म्हणजे खुद्द मुख्यमंत्री येडियुरप्पाचं या लग्न सोहळ्याला उपस्थित होते.

कोरोनाच्या जनजागृतीचे होर्डिंग

बेळगावमधील उदयबाग औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या शगुन गार्डन लॉन्सवर हा सोहळा पार पडला. या सोहळ्या तब्बल तीन हजार लोक उपस्थित होते,या सोहळ्यामुळे खानापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेकडो गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे विवाहस्थळी करोनाविषयी जनजागृती करणारे दोन होर्डिग्ज लावण्यात आल्या होत्या. दरम्यान, लॉकडाउन असताना हा सोहळा कसा करण्यात आला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावरही टीका करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती

या विवाह सोहळ्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगदी, श्रीमंत पाटील, आमदार महेश कुमठल्ली यांच्यासह भाजपा, काँग्रेस आणि जेडीयूचे नेते उपस्थित होते. त्यामुळे करोनामुळे उद्भवणाऱ्या संकटाची गांभीर्य राजकीय नेत्यांना नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.