‘कोरोना’च्या ‘रावणा’ला थोपवण्यात भारताला येतंय यश, दिलासादायक आकडेवारी समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना (coronavirus) संक्रमणाचा दर सध्या कमी होताना दिसतोय, ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात भारतात 50 हजार 129 नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. त्यासोबतच आत्तापर्यंतच्या एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 78 लाख 64 हजार 811 वर पोहचलीय. देशात सध्या एकूण 6 लाख 68 हजार 154 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मृत्यू दरात घट
मागील 24 तासांमध्ये कोरोना संक्रमणामुळे 578 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, हा गेल्या 98 दिवसातील म्हणजेच तीन महिन्यांहून अधिक काळातला हा सर्वात कमी आकडा आहे. आत्तापर्यंत देशात 1 लाख 18 हजार 534 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात 18 जुलैनंतर मृत्यू दरात घट झाल्याचं दिसून येतंय. सप्टेंबर महिन्यात देशात सर्वाधिक संक्रमण आणि मृत्यू फोफावल्याचं दिसून आलं. एका दिवसात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंद 15 सप्टेंबर रोजी झाली. या दिवशी 1275 नागरिकांचा मृत्यू झाला होता.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, 24 तासांत 62 हजार 077 रुग्णांनी कोरनावर मात केली आहे. यामुळे देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 70 लाख 78 हजार 123 वर पोहचली आहे. देशातील रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) 89.99 टक्क्यावर पोहचले आहे. सध्या देशामध्ये ॲक्टिव्ह रुग्णांचा दर 8.49 टक्के आहे तर मृत्यूचे प्रमाण 1.50 टक्के आहे. तसेच रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 4.39 टक्के आहे.

You might also like