कोरोनाच्या भीतीनं इराणमध्ये लोकांनी पिलं ‘मिथेनॉल’, अफवेमुळं 27 जणांचा मृत्यू

तेहरान : वृत्तसंस्था – आतापर्यंत 100 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेल्या घातक कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासंबंधी अफवा सुद्धा पसरत आहेत. अशाच प्रकारच्या अफवांमुळे इराणमध्ये 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसचा सुमारे 5 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. इराणने व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व शाळा आणि विद्यापीठांना बंद करण्यासह सांस्कृतिक आणि खेळाचे सर्व उत्सव रद्द केले आहेत.

चीनमधून पसरलेल्या या भयंकर व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत एक लाख पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे. तर 3000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. याच्यापासून बचाव करण्याबाबत इराणमध्ये अफवा पसरली आहे की, अल्कोहल प्यायल्याने या व्हायरसपासून बचाव होऊ शकतो.

इराणची न्यूज एजन्सी आयआरएनएच्या एका रिपोर्टनुसार, व्हायरसच्या संसर्गापासून वाचण्याबाबत अफवा पसरल्यानंतर अनेक लोकांनी मिथेनॉल प्यायले. यामुळे 27 लोकांचा मृत्यू झाला.

जुंदिशापुर मेडिकल यूनिव्हर्सिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, 218 लोकांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. जास्त प्रमाणात मिथेनॉल प्यायल्याने दृष्टी जाणे, लिव्हर खराब होणे, तसेच मृत्यू होण्याची भिती सुद्धा असते. यापूर्वी शनिवारी या व्हायरसमुळे इराणचे खासदार फतेमह रहबर यांचा मृत्यू झाला होता. ते 55 वर्षांचे होते.