नगरमध्ये सापडला कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण, राज्यातील आकडा 19 वर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील शहरी भागात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला असतानाच, आता ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव होता दिसून येत आहे. मुंबई, नागपूर, पुण्यापाठोपाठ आता अहमनगर जिल्ह्यात देखील कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. आज अहमनगरमध्ये कोरोना संसर्ग झालेला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा रुग्ण दुबईवरून आला आहे. दुबईवरून आलेल्या चार संशयितापैंकी एकाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही माहिती दीली. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 19 झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे 19 रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. राज्यातील जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेता शुक्रवार मध्यरात्रीपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू केला आहे. राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे आणि नागपूर येथील जीम, चित्रपट आणि नाट्यगृहे, जलतरण तलाव महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात ज्या संस्थांना धार्मिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे ती रद्द करण्यात येणार असून पुढील आदेश होईपर्यंत कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची परवानगी द्यावी अशी सूचना देखील देण्यात आली आहे.