Coronavirus Lockdown : महाराष्ट्रासमोर गंभीर आर्थिक संकट, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्र सरकारला पत्र

पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे काही दिवसांतच चित्र पालटले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रांना झळ सोसावी लागत असून, राज्याच्या उत्पन्नाला यामुळे फटका बसला आहे. कोरोनामुळे उत्पन्न थांबले आहे. त्यामुळे राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधत मदतीची मागणी केली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे अनेक उद्योग क्षेत्राला झळ सोसावी लागत आहे. त्याचा फटका राज्य सरकारच्या तिजोरीलाही बसू लागला आहे. राज्याच्या तिजोरीत येणारे उत्पन्न थांबले आहे.सध्या राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा संकटात केंद्राने विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी पवार यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय करातील हिश्यापोटी राज्याला मिळणारे 1 हजार 687 कोटी तसेच मदतरुपी अनुदानापोटी मिळणारे 14 हजार 967 कोटी रुपये अशी एकूण 16 हजार 654 कोटींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. ही थकबाकी 31 मार्चपर्यंत राज्याला मिळावी. ‘कोरोना’च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी 25 हजार कोटींचे विशेष पॅकेज महाराष्ट्राला मंजूर करावे यासंबंधीचे पत्र त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रातले मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर यांना पाठवले आहे.