‘मुंबईची लोकल बंद करणार नाही, बस सेवाही सुरूच राहतील’ : CM ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईमधील लोकल बंद करणार नाही असा खुलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. परंतु माझं आवाहन आहे की अनावश्यक प्रवास सर्वांनी टाळायला हवा. गरज असेल तर घराबाहेर पडा अन्यथा घरातून बाहेर पडू नका. गर्दी जर का ओसरली नाही तर नाविलाजानं आम्हाला काही कठोर पावलं उचलावी लागतील. परंतु अशी पावलं उचलण्याची आमची इच्छा नाही. जनतेनं आम्हाला सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे.” असंही ते म्हणाले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मला खात्री आहे की, जनतेला विषयाचं गांभीर्य कळालेलं आहे. पुण्यात काही जणांनी स्वत:हून दुकानं बंद केली आहेत. मी मुंबईसह इतर दुकानदारांना विनंती करतो की, जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं वगळता ज्यांची रोजच्या जीवनात गरज पडत नाही अशी दुकानं स्वत:हून बंद ठेवली जावी.”