‘कोरोना’वरील इंजेक्शनचा काळाबाजार, मुंबईत 1 इंजेक्शन एक लाख रूपयांना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांवर करण्यात येत असलेल्या उपचारांसाठी खाजगी रुग्णालयाकडून लूट सुरु असताना. दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दिल्या जाणाऱ्या इंजेक्शन आणि औषधांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आता एक इंजेक्शन १ लाख रुपयांना विकल्याचे समोर आले असून, या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला दिल्लीतून अटक केली आहे.

अद्यापही कोरोना वर मात करण्यासाठी ठोस असा उपाय सापडला नाही. मात्र, केंद्र सरकारने आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही औषधें आणि इंजेक्शन वापरण्यास परवानगी दिली आहे. टोसिलिजुमॅब (Tocilzumab) हे इंजेक्शन कोरोना रुग्णांना दिले जाते. पण मुंबईत या इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी नसीर खान या आरोपीस अटक केली असून, त्याच्याकडून १५ इंजेक्शन जप्त करण्यात आल्याची माहिती, डीसीपी अकबर पठाण यांनी दिली.

पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतून एक व्यक्ती मुंबईत इंजेक्शन विक्रीसाठी घेऊन येत असल्याचे त्यांना सांगितले. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळवून, आम्हाला दोन इंजेक्शन तातडीने हवे आहेत असून सांगून संपर्क साधला. त्यावरती एका इंजेक्शनची किंमत एक लाख रुपये असल्याचे आरोपीने सांगितले. ठरलेल्या व्यवहारानुसार आरोपी इंजेक्शन घेऊन आल्यावर त्याला अटक करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे अतिरिक्त १५ इंजेक्शन मिळून आले. आरोपी ४० हजारांचे इंजेक्शन एक लाख रुपयांना विकत होता.

चौकशीदरम्यान आरोपी नसीर खान याने सांगितले की, तो मूळचा उत्तराखंड येथील काशीपूरचा रहिवाशी असून, दिल्लीतून त्याला कोणीतरी इंजेक्शन मुंबईत विकण्यासाठी पाठवले होते. हे इंजेक्शन स्वित्झर्लंडहून भारतात एका बड्या कंपनीद्वारे मागवले जाते. त्यानंतर ते वितरित केले जाते. मुंबईत केवळ तीन ते चार वितरकांना हे इंजेक्शन विकण्याचा परवाना मिळाला आहे, अशी माहिती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्याने दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like