मुंबईत तब्बल 4 लाख लोक होम क्वारंटाईन !

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाचा कहर सुरुच असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने रुग्णांची संख्या, बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा मोठया प्रमाणावर शोध सुरु केला आहे. त्यामुळे मुंंबईत लक्षण नसलेले, परंतु कोरोनाबाधित संपर्कातील तब्बल 4 लाख नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मुंबईत दररोज 2 हजारांहून अधिक बाधितांची भर पडत आहेत. सातत्याने वाढणार्‍या रुग्णसंख्येला आवर घालण्यासाठी एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात 30 व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार संशयित रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे. मार्चपासून आजपर्यंत बाधितांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 27 लाख 28 हजार 94 व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी 10 लाख 41 हजार 019 अति जोखमीच्या, तर 16 लाख 87 हजार 885 कमी जोखमीच्या गटातील आहेत. यापैकी 23 लाख 40 हजार 032 संशयितांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर 18 सप्टेंबर रोजी गृहविलगीकरणात ठेवलेल्या संशयित रुग्णांची संख्या 3 लाख 86 हजार 511 इतकी होती. दरम्यान, 15 सप्टेंबर रोजी संशयितांची संख्या 26 लाख 27 हजार 494 इतकी होती. अवघ्या पाच दिवसांत मुंबईत तीन हजार 257 रुग्ण सापडले असून त्यांच्या संपर्कातील 1 लाख 1 हजार 410 संशयितांचा पालिकेने शोध घेतला आहे.