मुंबईत ‘निगेटिव्ह’ अन् ‘गोव्यात पॉझिटिव्ह’, ‘कोरोना’ चाचण्यांने रुग्णही चक्रावले

पणजी : वृत्तसंस्था – मुंबईत निगेटिव्ह निघालेले रुग्ण गोव्यात पॉझिटिव्ह ठरले असून राजधानी एक्सप्रेस ही आता गोव्यासाठी कोरोना एक्सप्रेस ठरली आहे. केवळ रेल्वेनेच नाही तर रस्तामार्गे आलेल्या काही लोकांच्या बाबतीतही असेच घडले आहे. त्यामुळे एखाद्या दिवसाच्या फरकाने घेतलेल्या कोरोना चाचण्यांचे अहवालाने लोक चक्रावून गेले आहेत. गोवा मागील लॉकडाऊन ३ मध्ये ग्रीन झोनमध्ये होता. पण, अन्य ठिकाणाहून आलेल्यांमुळे गोव्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरले. आता गोव्यातील कोरोना बाधितांची संख्या ५५ वर गेली आहे. गोव्यात रस्ता मार्गे येणार्‍यांना चेकनाक्यांवर अडविले जाते. तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात करण्यात आलेले चाचणी अहवाल नाक्यावरील यंत्रणांना दाखविला. त्यात ते निगेटिव्ह आढळले होते.

येथील मार्गदर्शक तत्वानुसार त्यांची पुन्हा जिल्हा रुग्णालयात नेऊन चाचणी करण्यात आली. त्यावेळी निगेटिव्ह ठरलेल्यांपैकी काही जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. चौकशीत रेल्वेतील शौचालयाचा वापर केलेल्या दोघांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. मुंबईहून गोव्यात येण्यासाठी लागणारा कालावधी हा अहवाल वेगळा दाखविण्याचे कारण ठरते.

कोरोना व्हायरस हा नुकताच शिरलेला असल्यास तो चाचणीत आढळून येईल असे नाही. तेथून गोव्यात पोहोचेपर्यंत काही वेळ जात असतो आणि इन्फेक्शन काही अंशी वाढलेले असते. तिसरे कारण म्हणजे चाचणी घेण्याची पद्धत. चाचणीसाठी घेतले जाणारे लाळेचे नमुने हे व्यवस्थितपणे घेणे आवश्यक असते. अन्यथा चाचणी अहवाल चुकीचा येण्याची शक्यता असते अशी माहिती आरोग्य यंत्रणांकडून देण्यात आली.