नेपाळच्या पंतप्रधान निवासमध्ये ‘कोरोना’चा कहर ! खासगी डॉक्टरसह तब्बल 76 सुरक्षा अधिकारी व कर्मचारी Covid-19 पॉझिटिव्ह

काठमांडू : वृत्तसंस्था – नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या अधिकृत निवासस्थानी अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. सल्लागार, डॉक्टर यांच्यासह 76 सुरक्षा कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नेपाळच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या अंतर्गत वर्तुळात असणार्‍या नेपाळी सैन्याच्या 28 कमांडोला कोरोनाची लागण झाली आहे. नेपाळ पोलिसांचे 19 अधिकारी, 27 सशस्त्र बल आणि गुप्तचर विभागाचे 2 अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

पंतप्रधानांचे सुरक्षा कर्मचारी बदलले आहेत
पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या अनेक सुरक्षा कर्मचार्‍यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांचे संपूर्ण पथक बदलण्यात आले आहे. नेपाळच्या अधिकृत बातमी संस्थेच्या म्हणण्यानुसार पंतप्रधानांच्या निवासस्थानी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह केस आल्यानंतर संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानांचे वैयक्तिक डॉक्टर डॉ. दिव्या शाह यांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. संपर्क ट्रेसिंगच्या आधारे, त्यांना भेटलेल्या सर्वांची पीसीआर चाचणी पंतप्रधानांच्या निवासस्थानी घेण्यात आली.

पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचे प्रधान राजकीय सल्लागार विष्णू रिमाल शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. यानंतर पंतप्रधानांचे प्रेस सल्लागार सूर्य थापा, परराष्ट्र व्यवहार सल्लागार राजन भट्टराई आणि पंतप्रधान निवासस्थानी पोस्ट केलेले त्यांचे वैयक्तिक छायाचित्रकार राजन काफळे यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली.