Coronavirus : खरंच पाकिस्ताननं ‘कोरोना’वर नियंत्रण मिळवलंय की ‘झोलझाल’ ?

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानकडून कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला जात आहे. तसंच जागतिक आरोग्य संघटनेनेही जगाला पाकिस्तानकडून शिकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा पाकिस्तानकडे वळल्या आहेत.पाकिस्तानमध्ये आता शाळा सुरू होणार असल्याची घोषणा पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये करोनाबाधितांच्या घाट झाल्याचे दिसून आले आहे.

कशाप्रकारे पाकिस्तानमध्ये कोरोना बाधितांची संख्या कमी झाली ?
पाकिस्तान आधीपासून बिकट आरोग्य व्यवस्था, आर्थिक संकटाचा सामना करत होता. अशातच एप्रिल-मे-जून या महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. यानंतर आता अचानक रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. अचानक कमी झालेल्या संख्येमुळे त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक पाकिस्तानी माध्यमांनी आपल्या वृत्तांमध्ये रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयातील आयसीयू पूर्ण भरले असल्याचे सांगितले होते. अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यासाठी भटकत होते. आणि अशा परिस्थितीत कोरोनाच्या रुग्णात घट होणे खूप आश्चर्यकारक बाब आहे. या असंतोषाला रोखण्यासाठी इम्रान खान यांच्या सरकारने कोरोना चाचणी कमी केली. इतर देशामध्ये चाचणीचे प्रमाण वाढत आहे तर पाकिस्तनमध्ये ते कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानमध्ये एका दिवसात ३० हजार कोरोना चाचणी करण्यात आली. हि आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे.

कोरोनावर नियंत्रण कि झोल ?
भारताच्या तुलनेत पाकिस्तानची लोकसंख्या कमी आहे. तरीदेखील १० लाख नागरिकांमध्ये १४०० इतके करोना चाचणीचे प्रमाण आहे. तर हेच प्रमाण भारतात १० लाख नागरिकांमध्ये ३७०० आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, २० जणांची कोरोना चाचणी केल्यास एक करोनाबाधित आढळत असल्यास कोरोना नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये कोरोना चाचणी दरम्यान प्रत्येक आठवी व्यक्ती हि कोरोनाबाधित आढळते तर भारतात ११ व्यक्ती कोरोना बाधित आढळते.

सोमवारी ५३९ नवीन करोनाबाधित
पाकिस्तानमध्ये सोमवारी कोरोना संसर्गाचे ५३९ नवीन रुग्ण आढळले. पाकिस्तनमध्ये ३ लाख २ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार ४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ६३८३च्या वर पोहोचला आहे. तर २ लाख ८९ हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे.