Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं 24 तासात 10 जणांचा मृत्यू तर 242 नवे पॉझिटिव्ह,आतापर्यंत 303 जणांचा बळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोदी सरकारनं 25 मार्च पासून संपुर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर केला असून सध्या देश लॉकडाऊन 4.0 मध्ये आहे. 31 मे पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार आहे. दरम्यान, पुण्यात कोरोनामुळं गेल्या 24 तासात 10 जणांचा बळी गेला आहे तर तब्बल 242 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आतापर्यंत पुणे शहरात कोरोनामुळं 301 जणांचा मृत्यू झाला आहे तर शहरालगतच्या 2 जणांचा देखील मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील एकुण कोरोना बाधितांची संख्या ही 6093 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी तब्बल 3450 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात 2340 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. त्यापैकी 166 रूग्ण हे क्रिटिकल असून 45 रूग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. दिवसभरात 186 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यामध्ये नायडूमधील 127, ससूनमधील 9 आणि इतर रूग्णालयातील 50 रूग्णांचा समावेश आहे. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गेल्या 24 तासात 242 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यामध्ये ससूनमधील 17, नायडूमधील 137 आणि खासगी रूग्णालयातील 88 रूग्णांचा समावेश आहे. गेल्या 24 तासात 10 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे शहरात कोरोनामुळं 301 जणांचा बळी गेला आहे तर शहरालगतच्या भागातील दोघांचा देखील कोरोनमुळं मृत्यू झाला आहे. अलिकडील काळात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्यानं पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.