Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 3871 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6159 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात 5 ते 6 हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरात 3 हजार 871 नवी रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6 हजार 159 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 6 हजार 526 वर पोहचली आहे. पुणे शहरात दिवसभरात 82 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 57 रुग्ण शहरातील आहेत तर 25 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 6 हजार 611 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 6 हजार 159 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 840 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज (मंगळवार) दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 16 हजार 650 स्वॅब तपासणी करण्यात आली. शहरात सक्रिय रुग्ण संख्या 45 हजार 075 इतकी आहे. यापैकी 1368 रुग्ण गंभीर आहेत, अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 7 लाख 99 हजार 232 रुग्णांपैकी 6 लाख 88 हजार 158 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 98 हजार 709आहे. कोरोनाबाधित एकूण 12 हजार 365 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 86.10 टक्के आहे.