Coronavirus in Pune : पुण्यात कोरोनाचे रेकॉर्डब्रेक नवे पॉझिटिव्ह ! गेल्या 24 तासात आढळले 1800 पेक्षा जास्त नवीन रूग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे गेल्या 2 आठवडयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पुणे शहरात रात्री 10 नंतर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 1805 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात शहरातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील 5 जणांचा शहरात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झपाटयानं वाढत असल्यानं कोरोनाचा पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे.

दिवसभरात 598 रूग्णांना उपचारानंतर हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात सध्या कोरोनाचे 341 क्रिटिकल रूग्ण असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 14 हजार 830 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 2 लाख 165 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे तब्बल 9 हजार 740 सक्रिय रूग्ण आहेत. आतापर्यंत पुणे शहरात कोरोनामुळं तब्बल 4 हजार 925 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क परिधान करावे तसेच बाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत म्हणून प्रशासनाकडून वेळावेळी आवाहन करण्यात आले आहे. आज दिवसभरात तब्बल 8 हजार 602 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 1 हजार 805 जणांचा अहवाल हा सकारात्मक आढळून आला आहे.