Coronavirus : रूग्णालयांसोबत संगनमत करून औषध विक्रेते देखील ‘जोमात’, औषधांच्या बिलाचेही ऑडीट करण्याची ‘मनसे’ची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांवरील उपचारासाठी महापालिकेने शहरातील काही मोठ्या रुग्णालयांसोबत करार केले आहेत. या करारानुसार महापालिकेकडून पाठविण्यात आलेल्या रुग्णांवर या रुग्णालयांत मोफत उपचार होणार आहेत. परंतू काही रुग्णालये अशा रुग्णांच्या नातेवाईकांना गरजेपेक्षा अधिकची औषधे आणायला भाग पाडत आहेत. उपचारांच्या नावाखाली रुग्णालये आणि त्यांच्या आवारातील औषध विक्रेते संगनमताने रुग्णांना लुबाडत असून महापालिकेने आवास्तव बिल आकारणार्‍या रुग्णालयांसोबतच औषध विक्रेत्यांकडील बिलांचीही तपासणी करावी, अशी मागणी मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

वसंत मोरे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना नवले हॉस्पीटल आणि पूना हॉस्पिटलमध्ये असा प्रकार घडत असल्याचा आरोप केला असून आयुक्तांनाही निवेदन दिले आहे. मोरे यांनी सांगितले, की या रुग्णालयांमधील मेडीकल ऑपरेटरकडून औषधांची प्रिस्किप्शन रुग्णाच्या नातेवाईकांना पाठविली जाते व औषधांच्या बिलांचे पेमेंट गुगल पेच्या मार्ङ्गत स्वीकारले जाते. प्रत्यक्षात रुग्णाला उपचाराच्या कालावधीत दिली जात असलेल्या औषधांपेक्षा दुप्पट औषधे मागविली जात आहे. एका रुग्णाबाबत पूना हॉस्पीटलच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी सारवासारव केली. असाच प्रकार नवले हॉस्पीटलमध्येही घडत आहे. परिचित रुग्णांमुळे यामध्ये लक्ष घातल्यानंतर रुग्णांची मोठ्याप्रमाणावर लूट होत असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत नवले रुग्णालय प्रशासनाला जाब विचारल्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतू कोरोनाच्या काळात केवळ उपचारच नाही तर औषधांच्या नावाखाली आतापर्यंत खाजगी रुग्णालयांनी किंबहुना महापालिकेने करार केलेल्या रुग्णालयांनी त्यांच्या आवारातील औषध विक्रेत्यांच्या संगनमताने रुग्णांच्या नातेवाईकांकडून कोट्यवधीची लूट केल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनाने कोरोना उपचारासाठी अधिकचे बिल आकारणार्‍या रुग्णालयांतील बिलांचे ऑडीट तपासण्यासाठी समिती नेमली आहे. या समितीने केवळ बिलांचे ऑडीट न करता रुग्णांना देण्यात आलेली औषधे आणि बिलांचे ऑडीटही करावे. काही औषध विक्रेत्यांची शहरातील अनेक रुग्णालयांत साखळी मेडीकल स्टोअर्स आहेत. या सर्व मेडीकल्सचेही ऑडीट करून संबधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही महापालिका आयुक्तांकडे करण्यात आल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.