Coronavirus in Pune Police : वर्षभरात पुणे पोलिस दलातील 11 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असतानाच कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यात गेल्या महिन्यात तब्बल 132 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आत्तापर्यंत 11 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोना संकटामुळे पोलीसांना गेल्या काही महिन्यांपासून सतत जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र रस्त्यावर उतरून बंदोबस्त करावा लागत आहे. त्यामुळे पोलीस दलातही कोरोनाची लागण होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान, नागरीकांना कोरोनापासून दूर ठेवतानाच एप्रिल 2020 पासून आतापर्यंत 1696 पोलिसांना कोरोना संसर्ग झाला आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता, त्यानंतर पुढच्या तीन-चार महिन्यात हे प्रमाण कमी झाले. त्यानुसार, पोलिस दलामध्येही कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प होते. मात्र यंदा मार्च महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढला. त्यामुळे नागरिकांशी सर्वाधिक संपर्कात येणा-या पोलिसांनाही त्याचा फटका बसायला सुरुवात झाली. मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत 132 जणांना कोरोनाची लागण झाली. यात 24 अधिकारी आहेत, तर 108 पोलिस कर्मचारी आहेत. त्यापैकी 3 अधिकारी व 16 कर्मचारी अशा 19 जणांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर उर्वरित 21 अधिकारी व 92 पोलिस कर्मचारी अशा एकूण 113 पोलिस गृहविलगीकरणामध्ये असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.