Coronavirus : ब्रिटनमध्ये ‘कोरोना’चा हाहाकार ! एकाच दिवसात 700 जणांचा मृत्यू

लंडन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसने ब्रिटनमध्ये कहर केला असून ब्रिटनमध्ये एकाच दिवसांत 700 लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून या ठिकाणची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. आत्तापर्यंत ब्रिटनमध्ये 40 हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वैद्यकीय तपासणी मोठ्या प्रमाणावर सुरु केली आहे. आतापर्यंत 1 लाख 83 हजार नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 41 हजार 903 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या आजाराने चार हजार 313 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये शनिवारी 708 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर शुक्रवारी 684 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये खबरदारीच्या विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लंडनमध्ये चार हजार खाटांची सुविधा दहा दिवसांच्या आत उभारण्यात आली आहे. शुक्रवारी ती सर्वासाठी खुली करण्यात आली आहे. तर एक हजार 500 रुग्णांसाठी पश्चिम उत्तरेकडील हॅरोगेट येथे दोन सुविधा नव्याने केल्या जात असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य सेवेने एका निवेदनातून दिली आहे. पुढील काळात बर्मिंगहॅम आणि मँचेस्टर येथेही अशा प्रकारचे रुग्णालय सुरु करण्यात येणार असून या ठिकाणी तीन हजार खाटांची सोय करण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.