Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या 4 वर तर मुंबईत ओला चालकाला देखील लागण

मुंबई / पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात दशहत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसने आता भारतातही शिरकाव केला असून दिल्लीपाठोपाठ पुण्यात दोन रूग्ण सापडल्याने महाराष्ट्रातही खळबळ उडाली होती. परंतु, यासंबंधी आणखी एक चिंताजन वृत्त असून पुण्यातील कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या आता वाढली असून ती पाचवर पोहचली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले एक दाम्पत्य सोमवारी आढळून आले होते. त्यांच्याशीच संबंधित आणखी दोन आणि अन्य एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे पुण्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे.

सोमवारी रात्री पुण्यातील एका दांपत्याला कोरोना व्हायरचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे दाम्पत्य 40 जणांच्या ग्रुपसोबत दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. 1 मार्चला ते भारतात आले. दोघांपैकी महिलेला त्रास होऊ लागल्याने तिने तपासणी केली असता कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आढळले. या महिलेच्या पतीचेही नमुणे घेण्यात आले होते, त्यांनाही संसर्ग झाल्याचे समजते.

ज्या 40 लोकांच्या ग्रुपसोबत हे दाम्पत्य दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते, त्या सर्वांची माहिती प्रशासनाने घेतली असून संबंधित प्रशासनाला ती कळवली आहे. कारण 40 जण विविध जिल्ह्यात राहणारे आहेत. त्यांची नावे आणि संपर्क क्रमांक घेऊन संबंधित प्रशासन त्यांच्यावर देखरेख ठेवणार आहे. तसेच त्यांची तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत

पुण्यातील दाम्पत्य दुबईहून आल्यानंतर मुंबई विमानतळावरून ते ओला कारने पुण्यात आले होते. यावेळी त्यांची मुलगीही त्यांच्या सोबत होती. या ओला कारच्या ड्रायव्हरला सुद्धा कारोना व्हायरसची लागण झाल्याचे समजते. तसेच आणखी एका व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. अद्याप पुणे जिल्हा प्रशासनाने यासंबंधी अधिकृत माहिती दिलेली नसून लवकरच ती देण्यात येईल. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या पुण्यातील नव्या रूग्णांसह आता देशातील एकुण रूग्णांची संख्या वाढली आहे. ओला चालक हा मुंबईतील आहे. तो मुंबईत ज्यांच्या संपर्कात् आला होता त्यांची देखील तपासणी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय.