Coronavirus : मुंबईत ‘कोरोना’चं थैमान ! दिवसभरात 8 जणांचा मृत्यू तर 103 नवीन रूग्ण, आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा जास्त फैलाव मुंबईत झाला असून मुंबईत आत्तापर्य़ंत 443 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 30 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसने मुंबईत हाहाकार माजवला असून प्रशासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाय योजना केल्या जात आहेत.

आरोग्य विभाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत मुंबईत 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई शहराची इतर राज्यांशी तुलना केल्यास ही संख्या खूप जास्त आहे. मुंबईत सध्या 443 पॉझिटिव्ह रुग्ण असून मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे समोर आले आहे. मागील तीन दिवसांमध्ये मुंबईत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तिघांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची तपासणी केली जात आहे. मृत्यू झालेल्यांमधील 6 जणांना दिर्घकालीन आजार होता. तर यापैकी 2 जण वृद्ध होते. आज मृत्यू झालेल्यांमध्ये 7 जण हे पुरुष असून 1 महिला होती. त्यांचे वय 50 ते 80 या दरम्यान असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

सध्या देशात कोरोना वेगाने पसरत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा 3000 च्यावर गेला आहे तर मृतांचा आकडा 75 वर पोहचला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. काल धारावीत 4 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे या ठिकाणच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.