Covid-19 : चिंताजनक ! देशात 24 तासात ‘कोरोना’चे 24248 नवे रुग्ण तर 425 मृत्यू, बधितांचा आकडा 7 लाखांच्या टप्प्यात

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरस संक्रमित होण्याचे प्रमाण वाढून 6 लाख 97 हजार 413 झाले आहे. 24 तासांत कोरोनाची 24 हजाराहून अधिक प्रकरणे आली आहेत. रविवारी आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, कोरोनाचे 24 हजार 248 नवीन रुग्ण आले आणि 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात कोरोनाचे 2 लाख 53 हजार 287 सक्रिय रुग्ण आढळले आहेत, आतापर्यंत 19 हजार 693 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत या साथीमधून 4 लाख 24 हजार 433 लोक बरे झाले आहेत ही दिलासाची बाब आहे.

आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात 86 हजाराहून अधिक संक्रमित लोकांवर रुग्णालात उपचार सुरू आहेत. त्यानंतर दुसर्‍या क्रमांकावर तामिळनाडू, तिसर्‍या क्रमांकावर दिल्ली, चौथ्या क्रमांकावर गुजरात आणि पाचव्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय प्रकरणे आहेत.

6,555 नवीन प्रकरणांसह महाराष्ट्रातील आकडेवारी 2,06,619 वर पोहचली.
रविवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 6,555 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यात संक्रमित लोकांची संख्या 2,06,619 वर पोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. त्यानुसार आणखी 151 रुग्णांच्या मृत्यूनंतर या प्राणघातक विषाणूमुळे मृतांचा आकडा वाढून 8,822 झाला आहे.

यूपीमध्ये कोरोनाची 1155 नवीन प्रकरणे, संक्रमित 27707 ची संख्या
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासांत, कोविड -19 मुळे आणखी 12 रुग्ण मरण पावले आहेत. तर कोरोना विषाणूची लागण झालेल्या 1155 नवीन प्रकरणांमुळे खळबळ उडाली आहे. इतकेच नाही तर या कोरोना साथीच्या आजारामुळे उत्तर प्रदेशात 785 लोकांचा बळी गेला आहे.

कोरोना प्रकरणात भारत तिसर्‍या स्थानावर पोहोचला आहे
जगभरात सर्वाधिक संसर्ग झालेल्या कोरोना प्रकरणात भारताने रशियाला मागे टाकून तिसर्‍या स्थानावर पोहचला आहे. त्यांच्यापुढील अमेरिका आणि ब्राझील आहेत जेथे दुप्पट जास्त प्रकरणे आहेत. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये अमेरिका अजूनही अव्वल आहे. तेथे आतापर्यंत 29.81 लाख लोक संसर्गाचे बळी ठरले आहेत, तर एक लाख 32 हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे.

रिकव्हरी दर देखील 60% पेक्षा जास्त आहे
देशात रिकव्हरी दरही 60 टक्क्यांहून अधिक आहे. अशी 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे रुग्णांची प्रकृती सुधारण्याचे प्रमाण 75% पेक्षा जास्त आहे. 4 राज्यांत 80% पेक्षा जास्त आहे. त्यापैकी चंदीगड अव्वल आहे. येथे 86.06 % रुग्ण बरे झाले आहेत.

आतापर्यंत एक कोटीच्या जवळ चाचण्या
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) मतेस 5 जुलैपर्यंत एकूण नमुन्यांची तपासणी एक कोटीच्या जवळपास आहे, त्यापैकी रविवारी 1,80,596 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.