Coronavirus : पुन्हा रेकॉर्डब्रेक वाढ ! भारतातील ‘कोरोना’बाधितांनी पार केला 3 लाखांचा टप्पा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 3 लाखांचा टप्पा पार केला असून भारतात आतापर्यंत एकूण 3 लाख 8 हजार 993 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 8 हजार 884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासामध्ये सर्वाधिक 11 हजार 458 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

भारतात मागील 24 तासांमध्ये 376 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे ही काळजी वाढवणारी आकडेवारी समोर येत असतानाच कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने भारतासाठी दिलासा मिळाला आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 49.94 टक्के इतका असून आतापापर्यंत देशभरात 1 लाख 54 हजार 330 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून अद्याप परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर गेल्याने चिंता वाढली आहे. एकीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असताना श्री गंगाराम रुग्णालयाचे डॉक्टर ए.पी. ब्योत्रा यांनी मात्र कोरोनाचा फैलाव सध्याच्या घडीला कमी होण्याची सध्या कोणतीही चिन्हं नसल्याचे म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा संवाद साधणार आहेत. राज्याची गटवारी करून 16 व 17 जून असे दोन दिवस हा संवाद चालणार आहे. लॉकडाऊन लागू करणे व पुढे तो शिथील करणे अशा काळातील प्रंतप्रधानांची ही चर्चेची सहावी फेरी ठरणार आहे. बदलेल्या परिस्थितीत या संवादादरम्यान काय चर्चा होते व कुठले नवीन निर्णय घेतले जातात. हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.