Coronavirus Impact : ‘रेल्वे’सह ‘बस’सेवा ठप्प, ‘लॉकडाऊन’ आणि ‘वर्क फ्रॉम होम’, ‘कोरोना’मुळं देशातील पहिल्यांदाच घडल्या ‘या’ 10 गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये सुरु झालेल्या कोरोना विषाणू साथीच्या रोगाने युरोप आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर विध्वंस केल्यानंतर कोरोना विषाणू भारतात पसरत आहे. आज कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची सख्या 430 च्या पुढे गेली आहे. भारत सरकार आणि अनेक राज्य सरकारांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. भारत सरकारने पहिल्यांदाच संपूर्ण भारतातील रेल्वे सेवा बंद केली आहे. राज्यांनी लॉक डाऊन करण्याचा निर्णय देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे देशाने पहिल्यांदाच घेतलेल्या 10 निर्णयांचा घेतलेला हा आढावा.

1. जगातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून गणले जाणारे भारतीय रेल्वे आता बंद करण्यात आली आहे. कोरोना विषाणूमुळे भारत सरकारने देशातील सर्व प्रवासी गाड्या बंद केल्या आहेत. लोक एकत्र येऊ नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली-नोएडा-लखनऊ-मुंबई-बेंगलुरू-कोलकत्ता यासह देशातील सर्वच शहरातील मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2. जागतिक बाजारात क्वचितच असे घडते की, एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यास बंदी घातली जाते. कोरोना विषाणूचा संसर्ग देशात वाढू नये यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमान सेवा पूर्णपणे बंद केली आहे. यापूर्वी हा निर्णय कोरोना बाधित देशांसाठी घेण्यात आला होता. मात्र, आता तो सर्व देशांसाठी घेण्यात आला आहे. तसेच परदेशी नागरिकांना देशात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

3. देशाची गती थांबण्याचे स्वातंत्र्यानंतर अनेक वेळा घडले आहे. परंतु केंद्र सरकारने सार्वजनिक कर्फ्यू लागू केल्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यानंतर अनेक राज्यांनी लॉक डाऊन केले आहे. देशाची लोकसंख्या 130 कोटीच्या घरात आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातील जनतेला घरात राहण्याचे बंधनकरक करणे हे सरकार पुढील मोठे आव्हान आहे.

4. अमेरिका-युरोपमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या ठिकाणच्या जनतेला घरात राहण्यास सांगण्यात आले आहे. भारतात देखील कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात देखील नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारला भारतातील 130 लोकांपर्यंत पोहचणे अशक्य आहे. त्यामुळे सरकारकडून लॉक डाऊन सारखे पर्याय निवडले जात आहे. देशातील अनेकजण सध्या घरात आहेत. काही लोकांनी स्वत:हून घरात राहणे पसंत केले आहे. तर काहींनी प्रशासनाच्या भीतीमुळे घरात राहणे पसंत केले आहे. परंतु या सर्वांचा एकच हेतू आहे तो म्हणजे कोरोनाचा प्रसार थांबवणे.

5. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात अजूनही काम सुरु आहे. परंतु कोरोना विषाणूमुळे हे कामकाज न्यायालयातील ठरावीक खोल्यांमध्येच सुरु आहे. दरम्यान, आज (सोमवार) न्यायालयाने एक निर्णय घेतला आहे. यापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच सुनावणी होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये वकील ज्या ठिकाणी असतील तेथून ते आपली बाजू मांडतील. देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होत आहे.

6. कोरोना विषाणूचा सर्वात मोठा धोका गर्दीमध्ये आहे. कारण गर्दीमधूनच या विषाणूचा फैलाव जास्त प्रमाणात होत आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार देशाच्या विविध तुरुंगातील कैद्याची काळजी घेत आहे. सध्या कोरोनाचा प्रसार कारागृहात झाला नाही. मात्र, अशा परिस्थितीमध्ये काही कैद्यांना पेरोलवर सोडण्याचा विचार सरकार करत आहे. सरकार सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेणार आहे.

7. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉक डाऊन करण्यात आले आहे. याचा परिणाम कामकाजावर होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगावे असे सरकारने सांगितले आहे. आयटी कंपनी किंवा मीडिया कंपनी असो. तसेच इतर क्षेत्रातील कंपन्यानी देखील आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगावे असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

8. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोट्यावधी लोक घरात बसून काम करत आहेत. केवळ आवश्यक सेवामधील कर्मचारीच घराबाहेर पडत आहेत. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी करण्यात आली असून आवश्यक असणारेच 5 टक्के कर्मचारी कार्यालयात येत आहेत.

9. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले आणि लोकांना आपल्या घरातच राहण्याचे आवाहन केले. याला जनता कर्फ्यू असे म्हणतात. या जनता कर्फ्यूचे पालन देशातील जनतेने केले. तसेच कोरोना संकटादरम्यान काम करणाऱ्या डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार आणि पत्रकारांचे आभार मानण्यासाठी लोकांना त्यांच्या घरातून टाळ्या वाजवून, थाळी वाजवून या सर्वांचे आभार मानण्याचे पंतप्रधानांनी आवाहन केले होते. त्यानुसार रविवारी सायंकाळी पाच वाजता देशातील जनतेने घरातून थाळी, घंटा, टाळ्या वाजवून आभार मानतानाचे दृष्य पहायला मिळाले.

10. देशातील बहुतेक सण किंवा सरकारी सुट्टीच्यावेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसतो. या दिवशी लोक आपल्या घरातच राहणे पसंत करतात. मात्र, त्या काळात मंदिर, मशिद, गुरुद्वारा, चर्च उघडे असतात. परंतु कोरोनामुळे देशातील सर्व मोठी धार्मिक स्थळ बंद ठेवण्यात आली आहे. हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. बहुतेक धार्मिक स्थळाच्या विश्वस्तांनी लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे.