Coronavirus : भारत ‘त्या’ यादीत पहिल्या स्थानावर, ‘नकोसा’ विक्रम केला आपल्या नावावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगभरात कोरोना विषाणूचे 58 लाखाच्या वर रुग्ण असून 3.5 लाखावर रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. लॉकडाऊन असूनही कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे.


देशातील कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 60 हजाराच्यावर गेली आहे. यामुळे भारताच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे. आशियातील देशांचा विचार केला तर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. सध्या जगातील केवळ आठच देशांमधील कोरोना रुग्णांचा आकडा भारतापेक्षा जास्त आहे. worldometers.info या संकेत स्थळावर जगभरातल्या कोरोनाबाधितांची आकडेवारी देण्यात आली आहे.

भारतात सध्याच्या घडीला कोरोनाचे 1 लाख 60 हजार 310 रुग्ण आहेत आशिया खंडात इतकी रुग्णसंख्या कोणत्याही देशात नाही. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आतापर्यंत 1 लाख 58 हजार 333 रुग्ण सापडल्याची माहिती दिली आहे. यातील 67 हजार 691 जण बरे झाले असून 4 हजार 531 जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी मंत्रालयानं दिली. देशात 86 हजार 110 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात सर्वाधिक रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रामध्ये रुगणांची संख्या 56 हजाराच्या वर गेली आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडू, दिल्ली, गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो.

आशियाई देशांचा विचार केला तर भारत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तुर्कस्तान (1,59,797), इराण (1,43,849), चीन (82,995), सौदी अरब (80,185), पाकिस्तान (61,227), कतार ( 50,914), बांगलादेश (40,321), सिंगापूर (33,249), संयुक्त अरब अमिरात (32,532) या देशांचा क्रमांक लागतो.